राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाची घोषणा 
महाराष्ट्र

राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाची घोषणा

निवडणूक आयोगाने या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या आमदारांसाठी मतदानासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) शुक्रवारी (दि. २२) राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणूक, तर दोन जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील एका रिक्त जागेचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी आता १८ जून रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणीही पार पडणार आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ही जागा सुनेत्रा पवार यांनी ६ मे रोजी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाली. त्यांचा कार्यकाळ ४ जुलै २०२८ पर्यंत होता.

त्याचबरोबर, तामिळनाडूमधील सी. वे. शन्मुगम यांच्या राजीनाम्यानंतर तेथील राज्यसभा जागेसाठीही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार,

  • निवडणुकीची अधिसूचना १ जून रोजी जारी करण्यात येणार आहे.

  • नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून निश्चित करण्यात आली आहे.

  • नामनिर्देशन अर्जांची छाननी ९ जून रोजी होणार असून उमेदवारांना ११ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

१८ जूनला मतदान आणि मतमोजणी

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २० जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

आमदारांसाठी मतदानासंदर्भात विशेष मार्गदर्शक सूचना

निवडणूक आयोगाने या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या आमदारांसाठी मतदानासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मतपत्रिकेवर पसंतीक्रम चिन्हांकित करण्यासाठी फक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा लागणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. इतर कोणत्याही पेनचा वापर केल्यास मत अवैध ठरेल, असे आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. यामध्ये निवडणूक निरीक्षकांची नियुक्तीही करण्यात येणार आहे.

पेन्शनधारकांना अधिक परतावा; नव्या गुंतवणूक पर्यायांचा समावेश करण्यासाठी PFRDA ची समिती स्थापन

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका; सनद फी माफ करण्याची महसूल मंत्री बावनकुळेंची घोषणा

Mumbai : दादर ते सिद्धिविनायक मंदिर गारेगार प्रवास; शनिवारपासून २० ते २२ मिनिटांच्या अंतराने AC बससेवा

ठाणे आग: सहाय्यक आयुक्तांना निलंबित करा; आमदार केळकर यांची मागणी

कल्याण रेल्वे स्थानक मारहाण प्रकरण : राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता