अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर

राज्यातील विविध जिल्ह्यांत अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून १३ जणांना प्राण गमवावा लागला आहे, तर किमान २८ जण जखमी झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Swapnil S

पुणे/मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांत अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून १३ जणांना प्राण गमवावा लागला आहे, तर किमान २८ जण जखमी झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तसेच यातील दोन भीषण अपघात हे नेत्यांच्या मुलांमुळे घडले असल्याने वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोलीतील कटकेवाडी फाट्याजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. कोल्हापुरात गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्या चिरंजीवाच्या कारने दोघांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडमध्ये भाजप नगरसेवक पुत्राच्या भरधाव कारने पती-पत्नीला उडवल्याने त्यांचा मृत्यू ओढवला आहे. तसेच भाईंंदरमध्ये नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी नालासोपारा येथून मीरारोडच्या दिशेने प्रवास करणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात झाला. या दुर्घटनेत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर समृद्धी महामार्गावरील तीन अपघातांत एक ठार, तर २३ हून अधिक जखमी झाले आहेत.

‘समृद्धी’वर तीन अपघातांत एक ठार, तर २३ जखमी

यवतमाळ : समृद्धी महामार्गावर रविवारच्या मध्यरात्री अपघातांची मालिका पाहायला मिळाली. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या तीन अपघात झाले असून, यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तब्बल २३ ते ३० जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये ८ ते १० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अशातच यवतमाळहून मुंबईकडे जाणारी खासगी बस पुलाला धडकून पलटी झाली. तर नागपूर कॉरिडॉरवर बोलेरो पिकअप आणि कारचाही अपघात झाला. सुदैवाने अन्य दोन अपघातांमध्ये जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अपघातांनंतर समृद्धी महामार्गावरील बचाव पथक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग व सतत होणारे अपघात याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

बीड येथे गाड्यांच्या रेसने घेतले जीव; भाजप नगरसेवक पुत्राच्या कारने पती-पत्नीला उडवले

बीड : भाजप नगरसेवकाच्या मुलाने भरधाव कार चालवताना केलेल्या अपघातामध्ये एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बीडच्या माजलगाव येथे ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे. यामध्ये भाजप नगरसेवकाच्या मुलाच्या कारने दिलेल्या धडकेत दोन्ही पती-पत्नी हवेत उडाल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. ही धडक इतकी भीषण होती की, रुग्णालयात उपचाराला नेण्यापूर्वीच पती-पत्नीचा मृत्यू झाला. हे पती-पत्नी त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना भाजप नगरसेवकाच्या मुलाने त्यांना कारने उडवले. माजलगाव येथील भाजपाचे नगरसेवक दिलीप मेंडके यांचा मुलगा दक्ष मेंडके हा युवक चारचाकी गाडी चालवत होता. यावेळी तरुणांची गाड्यांची रेस सुरू होती, असे स्थानिकांनी सांगितले. तसेच या शर्यतीच्य नादात दक्ष मेंडके याने दुचाकीवरील कुटुंबाला शंभर ते दीडशे फुट फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

जेजुरीजवळ ‘शिवाई’च्या धडकेत दाम्पत्य ठार

पुणे : जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर देखील आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. शिवाई बस आणि दुचाकीच्या धडकेत नाझरे येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. महेंद्र नाझीरकर आणि रेश्मा नाझीरकर असे मृतांचे नाव आली आहे. याप्रकरणी, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास सुरू असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. मात्र, याप्रकरणी बस ड्रायव्हरवर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिसरला डंपरच्या धडकेत महिला जखमी

मुंबईच्या दहिसर पूर्वेतही अपघाताची घटना घडली असून दहिसर पोलीस स्टेशनजवळ मानव कल्याण हॉस्पिटल सिग्नलवर भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरने महिलेला चिरडले. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी, दहिसर पोलिसांकडून गुन्हा दाखल करुन आरोपी डंपर चालकाचा शोध सुरू आहे.

मुंब्य्रात कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

मुंब्रा - ठाणे मार्गावरील रेतीबंदर रोड येथे कंटेनर आणि दुचाकीच्या धडकेत १८ वर्षीय अरिस कुरेशी आणि इरफान अन्सारी यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातनंतर कंटेनरचालक पसार असून मुंब्रा पोलीस तपास करीत आहेत.

भाईंदरमध्ये दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात; पतीचा मृत्यू

भाईंदर : नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी नालासोपारा येथून मिरारोडच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दाम्पत्याचा दुचाकीला अपघात झाला. या दुर्घटनेत ४८ वर्षीय पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पत्नी जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वेलकर पंपाजवळ घडला. याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

वाघोलीत तीन मित्रांचा मृत्यू

पुणे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोलीतील कटकेवाडी फाट्याजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. पाच मित्र वोक्सवॅगन पोलो कारमधून प्रवास करत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार प्रथम रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री कारमधून पाच मित्र पुणे-अहिल्यानगर मार्गावरून घरी जात होते. यावेळी मयुर औटी हा कार चालवत होता. कटकेवाडी फाटा परिसरातील कमानीजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

या दुर्घटनेत ओंकार अजय सूर्यवंशी (वय २४, रा. प्रभुरामनगर, वाघोली), मयुर सतीश औटी (वय २६, रा. वाघोली, मूळ रा. पारनेर, अहिल्यानगर) आणि शंकर वासुदेव ढोळे (वय २२, रा. प्रभुरामनगर, वाघोली, मूळ रा. हिंगोली) यांचा मृत्यू झाला. तिघेही खासगी नोकरी, व्यवसाय आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित होते.

कोल्हापुरात ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचे दोन बळी

कोल्हापूर : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक आणि ड्राईव्हचा भीषण थरार पाहायला मिळाला. त्यामध्ये, गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्या चिरंजीवाच्या कारने दोघांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली. या दुर्घटनेत दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ होत आहे. याप्रकरणी पद्मसिंह पाटील याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाजवळ ही थरारक घटना घडली. उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर पद्मसिंह पाटील घटनास्थळावरून पळाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. कोल्हापुरातील मध्यरात्रीच्या ड्रंक अँड ड्राईव्हचा हा थरार आता जिल्हाभर चर्चेत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अर्थव्यवस्थेची भरभराट, राहुलचा जळफळाट

आजचे राशिभविष्य, २४ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

थंडीच्या दिवसांत चहात तुळशीची पाने टाकताय? आधी हे वाचा! प्रत्येक तुळशीची चव नसते सारखी

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी