मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., ही राज्यातील ५७४६ कोटी मूल्य असणारी बँक आहे. शासन व्यवहारासाठी २०२६-२७ सालासाठी राज्य सहकारी बँकेची निवड सरकारने केली आहे. हा बहुमान मिळवणारी राज्य सहकारी बँक ही एकमेव सहकारी बँक आहे, असे बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
२० ऑगस्ट रोजी राज्य शासनाने जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाप्रमाणे २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शासकीय कार्यालयांचे बँकिंगविषयक तसेच सार्वजनिक उपक्रम व महामंडळाकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी या बँकांना पात्रता धारण करणाऱ्या बँका म्हणून घोषीत केले. यात अनुसूचित वाणिज्य बँकांच्या यादीमध्ये इतर अकरा बँका आहेत.
सहकारी बँकांच्या यादीमध्ये राज्य सहकारी बँकेचे नाव आहे. अन्य कोणत्याही सहकारी बँकांना ही पात्रता धारण करता आलेली नाही. यात राष्ट्रीय बँकेसह व्यापारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेस मिळालेले स्थान अभिमानास्पद आहे.
शासनाने आकारमान, भांडवली पर्याप्तता आणि नियामक निकषाचे पालन करणाऱ्या बँकांचाच या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे या पात्र निकषामध्ये राज्य सहकारी बँकेचा या यादीतील समावेश हा बँकेच्या पात्रतेचा विषय नसून सहकारी बँकेची आर्थिक क्षमता, विश्वासार्हता आणि संस्थात्मक सामर्थ्य यांना मिळालेली शासनमान्य पावती आहे.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)