सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर
‘कर्ज काढून, हात उसनं घेऊन सोयाबीन पेरलं, मल्चिंगवर मिरची बी लावली, मका पीक पेरलं . मह्या पोराचा शेतीवर लय जीव, पण पेरलेल्या पिकातलं हातात काही आलं नाही, उलट दुष्काळानं माझा लेक न्येला! जिथं सोयाबीन हुतं, तिथंच लेकाला अग्नी दिला. आता त्याची राख उडती आन त्ये बगून काळीज फाटत जातंया हो...’
आत्महत्या केलेल्या एका तरुण शेतकऱ्याच्या आईने व्यक्त केलेली ही भावना काळीज पिळवटून टाकणारी आहे. त्यावरून दुष्काळाची दाहकता किती खोलवर गेली आहे, याचे भयाण वास्तव मराठवाड्यात दिसून येते. विजय गोविंदराव बचाटे (वय ३६, रा. मुरूमखेडा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी २८ सप्टेंबरच्या सायंकाळी विषारी औषध पिऊन जीवन संपवले. त्यांच्या घरी, शेतात जाऊन शिवार बघितले, नी शब्दच गोठले...वाया गेलेल्या सोयाबीनच्या शेतात मृत विजय बचाटे यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याचे सांगताना त्यांची आई जिजाबाई यांनी अश्रूंना वाट करून देत शेतकऱ्यांची प्रातिनिधिक व्यथाच मांडली.
लेकाला अग्नी दिल्याची राख उडते...
घरापासून अवघ्या, १००-२०० मीटर अंतरावर मृत विजय यांना अग्नी देण्यात आला. ‘उन्हाळ्यासारख्या रखरखत्या उन्हात वारा सुटला की राख उडून अंगणापर्यंत येती, तवा माझं काळीज फाटून जातं,’ अशी भावना जिजाबाईंनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, ज्या शेतात विजय यांना अग्नी दिला होता, त्याच शेतात सोयाबीन पेरणी केली होती. त्यात काहीच हाती आलं नाही, म्हणून सोयाबीन काढून टाकलं. बाजूलाच पाण्याअभावी सुकलेला मका आहे. त्याच्याच दुसऱ्या बांधालगत मल्चिंग अंथरून महागडी औषधं, खत वापरून मिरची लावली होती. आता विहिरीला पाणी नाही. त्यामुळे फुलोऱ्यातल्या मिरचीने माना टाकल्या हायंत’, असेही त्यांनी सांगितले.
नापिकी - कर्जबाजारीपणाने घेतला जीव
नावावर होतं. त्याचा बोजा सातबाऱ्यावर होता. बँकेच्या नोटिसा लेकाला येत होत्या, हातउसन्या पैशांचं देणं होतं. ट्रॅक्टरचाही हप्ता होता. नापिकी आणि - कर्जबाजारीपणा या विवंचनेतून विजयनं २८ सप्टेंबरच्या सायंकाळी विषारी औषध पिऊन जीवन संपवलं. विजय बचाटे यांचा मोठा मुलगा विठ्ठल आठवीत, तर मुलगी लक्ष्मी सातवीत शिकते. 'वडील मला शेवटचं म्हटले, की मला येकदा पाणी दी... इतकंच आमचं शेवटचं बोलणं झालं,' असे विठ्ठलने सांगितले. तर मुलगी लक्ष्मी अजून वडील गेल्याच्या धक्क्यातून सावरलेली नाही.
कर्जाचा डोंगर अन् बँकेचा तगादा...
जिजाबाईंनी सांगितले, की एका मल्टिस्टेटचं पाच लाखांचं कर्ज विजयच्या डोक्यावर अन् आमाला दोन एकर रान हायं. चार-पाच दिवसापस्नं मालक विजय तणावातच व्हते, पण काही बोलत नव्हते. कर्ज काढून आमी गावड्या (गायी) घ्यातल्या व्हत्या. त्यातल्या कै गावड्याला आजार झाल्ता म्हणून त्या मेल्या, लोकांचं देणं बी व्हतं, हायल्याला गावड्या बी इकून टाकल्या. हिरीला पाणी नाही. रानात एक बी पीक हातात आलं नै. औषाद पिऊन घरात यिऊन मला म्हणले, कर्ज लै झालंय, आता मी ऱ्हात नाही. गावातल्या लोकांकडनं पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलं होतं आणि मल्टिस्टेटकडनं पाच लाख असं दहा लाख कर्ज होतं. मालकानी औषाद पिऊन जीव दिला आमी लेकरासकट रस्त्यावर आलूया. - कासाबाई बचाटे, मृत विजय यांच्या पत्नी