छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाने ५०० हून अधिक विहिरींचे अधिग्रहण केले आहे. तसेच १४२ गावे आणि ९१ वाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी २४६ टँकर तैनात करण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
विहिरींचे अधिग्रहण
अधिकृत आकडेवारीनुसार, दुष्काळप्रवण मराठवाडा विभागात ६७९.५ मिमी या सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ ४४२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण घटल्याने अनेक गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार प्रशासनाने विभागात एकूण ५१२ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा
२१ सप्टेंबरपर्यंत चार बाधित जिल्ह्यांमध्ये २४६ टँकर तैनात करण्यात आले आहेत. यात बीडमध्ये १२०, छत्रपती संभाजीनगरमध्ये ९६, जालन्यात २२ आणि धाराशिवमध्ये ८ टँकर सुरू असून त्याद्वारे १४२ गावे आणि ९१ वाड्यांना पाणी पुरवले जात आहे.