मराठवाड्यातील शाळांची दुरवस्था! केवळ इमारती 'हजर'; वीज, बाके, स्वच्छतागृहे 'गैरहजर'; 'स्कूल ठीक करो'तून समोर आले वास्तव X | व्हिडीओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
महाराष्ट्र

मराठवाड्यातील शाळांची दुरवस्था! केवळ इमारती 'हजर'; वीज, बाके, स्वच्छतागृहे 'गैरहजर'; 'स्कूल ठीक करो'तून समोर आले वास्तव

गळणारी छते, जीर्ण झालेल्या भिंती, तुटलेल्या खिडक्या-दारे, अपुरी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि अनेक ठिकाणी वीज जोडणीचा अभाव... मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पायाभूत सुविधांची दुरवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

प्रतिनिधी

सुजित ताजणे /छत्रपती संभाजीनगर:

गळणारी छते, जीर्ण झालेल्या भिंती, तुटलेल्या खिडक्या-दारे, अपुरी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि अनेक ठिकाणी वीज जोडणीचा अभाव... मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पायाभूत सुविधांची दुरवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने छेडण्यात आलेल्या 'स्कूल ठीक करो' अभियानातून मराठवाड्यातील हे वास्तव समोर आले आहे. अभिजीत दीपके यांच्या हिंगोली जिल्ह्यातील संयुक्त पिंपरी येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. प्राथमिक आकडेवारीनुसार, मराठवाड्यात तब्बल ७,१०७ वर्गखोल्या दुरवस्थेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मांडण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील २,१४१ शाळांमध्ये वीज उपलब्ध नाही, तर ३,४५१ शाळांमध्ये वीज जोडणी असूनही तिचा वापर होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याशिवाय १,६२५ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याच्या बाकांची सुविधा नाही, तर २,१९६ शाळांमध्ये संरक्षणात्मक कुंपण नसल्याचे अभियानातून पुढे आले आहे. १,१६६ शाळांना खेळाचे मैदान उपलब्ध नसल्याचेही आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.

मुलींच्या आरोग्याला धोका

स्वच्छतागृहांची परिस्थितीही चिंताजनक आहे. तब्बल ३,३२० शाळांमधील स्वच्छतागृहे वापरात नसल्याचे सांगण्यात आले आहे. २२२ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधाच उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानली जात आहे.

दादा भुसे यांचे निर्देश

'स्कूल ठीक करो' अभियानातून समोर आलेल्या शाळांमधील दुरवस्था व त्रुटींची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तातडीने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून आवश्यक सूचना दिल्या. शाळांमध्ये आढळणाऱ्या त्रुटी निदर्शनास आणून देणाऱ्या सूचनांचे स्वागत असून, त्या सूचनांच्या आधारे आवश्यक सुधारणा लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने विभाग काम करीत असल्याची भूमिका भुसेंनी स्पष्ट केली. शिक्षण विभागाने आता 'मिशन मोड 'वर काम करून सुधारणा राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

सुविधांचा 'पंचनामा'

वीज उपलब्ध नसलेल्या शाळा - २,१४१

वीज जोडणी असूनही वापरात नसलेल्या शाळा - ३,४५१

वापरात नसलेली स्वच्छतागृहे - ३,३२०

मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसलेल्या शाळा - २२२

बसण्यासाठी बाकांची सुविधा नसलेल्या शाळा - १,६२५

खेळाचे मैदान नसलेल्या शाळा - १,१६६

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'