मुंबई : प्रसिद्ध माथेरान गिरीस्थान येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांची वाहनतळाची मोठी समस्या आता कायमची सुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माथेरानमधील दस्तुरी नाका येथील २२,३३३.७० चौ.मी. क्षेत्रफळाचा मोठा शासकीय भूखंड वाहनतळासाठी माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने नुकताच या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी करून या जमिनीच्या हस्तांतरणास मंजुरी दिली आहे.
मौजे माथेरान (दस्तुरी), ता. कर्जत, जि. रायगड येथील भूखंड क्र. ९३, सीटीएस नं. ३ मधील २२,३३३.७० चौ.मी. क्षेत्रफळाची ही शासकीय जमीन आता माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या ताब्यात दिली जाणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदींनुसार ही जमीन 'भोगवटादार वर्ग-२' या धारणाधिकाराने, पूर्णपणे विनामूल्य (भोगाधिकार मूल्यरहित) आणि महसूल मुक्त किमतीने नगरपरिषदेला सुपूर्द करण्यात येत आहे. वर्ग २ च्या शासकीय अटी-शर्तीनुसार हा भूखंड नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याने तिथे वाहनांना बंदी आहे. त्यामुळे सर्व पर्यटकांना आपली वाहने दस्तुरी नाक्यावरच पार्क करावी लागतात. सुट्टयांच्या काळात तिथे जागेअभावी वाहनांच्या प्रचंड रांगा लागत असत. आता तब्बल २२ हजार चौरस मीटरहून अधिक जागा पार्किंगसाठी मिळाल्याने पर्यटकांचा प्रवास अधिक सुकर होणार असून माथेरानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री