दूध २ रुपयांनी महागले; दुग्धजन्य पदार्थांच्या दरांमध्येही १० टक्क्यांपर्यंत वाढ, नवे दर मंगळवारपासून होणार लागू 
महाराष्ट्र

दूध २ रुपयांनी महागले; दुग्धजन्य पदार्थांच्या दरांमध्येही १० टक्क्यांपर्यंत वाढ, नवे दर मंगळवारपासून होणार लागू

वाढत्या उत्पादन खर्चाचा मोठा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

Swapnil S

पुणे : वाढत्या उत्पादन खर्चाचा मोठा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. दूध विक्री दरामध्ये प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. तसेच केवळ दूधच नाही, तर बाजारातील विविध दुग्धजन्य पदार्थांच्या दरांमध्येही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. ही नवीन दरवाढ मंगळवार, ११ ऑगस्टपासून लागू होणार असल्याने ग्राहकांना आता दुधासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दूध व्यवसायावर पडत असलेल्या वाढत्या आर्थिक बोजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रक्रिया, वाहतूक खर्चात झाली वाढ...

डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांची झालेली वाढ, साखरेच्या दरात प्रतिकिलो १२ रुपयांची झालेली वाढ आणि पॅकिंगच्या एकूण खर्चात झालेली ३० टक्क्यांहून अधिक वाढ यामुळे दुग्ध व्यवसायाचा प्रक्रिया आणि वाहतूक खर्च कमालीचा वाढल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. याशिवाय, अलीकडच्या काळात दूध खरेदी दरात झालेली वाढ आणि आगामी काळात दूध खरेदी दरांमध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊनच अखेर हा दरवाढीचा निर्णय घ्यावा लागल्याचे दूध संघांकडून सांगण्यात आले. सहकारी आणि खासगी दूध संघांचे सुमारे २० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

गृहिणींच्या बजेटवर थेट परिणाम

या बैठकीत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित चेअरमन अरुण सीताराम चांभारे यांचा संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, मानवी आरोग्याला आणि दूध व्यवसायाला घातक ठरणाऱ्या 'अॅनालॉग पनीर'वर बंदी आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आमदार विक्रम पाचपुते यांचेही बैठकीत जाहीर आभार मानले. डिझेल, साखर आणि पॅकिंग साहित्याच्या दरवाढीमुळे ओढवलेल्या या संकटामुळे दूध संघांना हा दरवाढीचा निर्णय घेणे भाग पडले असून, याचा थेट परिणाम आता गृहिणींच्या बजेटवर होणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रश्न नको, उत्तरे शोधा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना सल्ला

भारतावर १०० टक्के आयात शुल्क; अमेरिकन सिनेटने विधेयकाला दिली बहुमताने मंजुरी

Mumbai : सिद्धिविनायक गैरव्यवहार; सखोल चौकशी होणार

तरुणांसाठी वेळ नाही, मात्र गद्दारांच्या 'पाठीशी'! उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधानांवर घणाघात; 'भिऊ नकोस'... संदेश नेमका कोणासाठी?

आजचे राशिभविष्य, ९ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत