सुजित ताजणे
छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरविल्याने मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत दुष्काळाचे चटके तीव्र झाले आहेत. शेतातील पिके करपल्यानंतर आता त्याची झळ थेट गोठ्यापर्यंत पोहोचली आहे. चारा आणि पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती, पाण्याची टंचाई तसेच वाढत्या उष्णतेचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत असून, अनेक भागांत दूध उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दूध उत्पादक सांगत आहेत.
दूध व्यवसायातून दररोज मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा खर्च भागविणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता जनावरांचा सांभाळ करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे दूध उत्पादन घटले आहे, तर दुसरीकडे चारा, ढेप आणि पशुखाद्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र कमी होत आहे.
किशन जगमाल येथील एका डेअरी फार्ममध्ये ५० म्हशी आहेत. मात्र सध्या त्यापैकी केवळ १५ म्हशी नियमित दूध देत आहेत. डेअरीचा दररोजचा खर्च तब्बल १९ ते २० हजार रुपये, तर दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न सुमारे १२ हजार रुपये इतके राहिले आहे. त्यामुळे दररोजचा खर्च आणि उत्पन्न यातील तफावत वाढत चालली आहे.
दूध कमी; खर्च मात्र वाढता
दूध उत्पादनातील घट आणि वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. जनावरांना चारा देण्यासाठी मोठा खर्च होत असतानाच दूध उत्पादन कमी झाल्यामुळे प्रतिलिटर उत्पादन खर्च वाढत आहे. त्यातच काही भागांत दूध खरेदीचे दर कमी झाल्याने संकट अधिक गंभीर झाले आहे. दुग्ध व्यवसायातून मिळणारे नियमित उत्पन्न कमी झाल्याने कर्जाचे हप्ते, घरखर्च, जनावरांचे औषधोपचार आणि चारा खर्च भागविणे शेतकऱ्यांसाठी कठीण होत आहे.
१२ हजारांचा चारा २० हजारांवर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही परिस्थिती वेगळी नाही. पूर्वी सुमारे १२ हजार रुपयांना मिळणारी चाऱ्याची गाडी आता २० हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चारा महागल्याने जनावरांना पुरेसा आणि पौष्टिक आहार देणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. चाऱ्याच्या कमतरतेचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होत आहे. पूर्वी १० लिटर दूध देणाऱ्या गायी आता केवळ सात ते आठ लिटर दूध देत असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे.