महाराष्ट्र

आंदोलनांमुळे फुटीचा धोका - सरसंघचालक; विजयादशमी महोत्सवात केले शस्त्रपूजन

केवळ सत्तेची किंवा राजवटीची अदलाबदल केल्याने देशातील मूलभूत प्रश्न सुटत नाहीत, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी व्यक्त केले. आंदोलने ही राजकीय स्वार्थाची हत्यारे बनून समाजात फूट निर्माण करू शकतात, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Swapnil S

नागपूर : केवळ सत्तेची किंवा राजवटीची अदलाबदल केल्याने देशातील मूलभूत प्रश्न सुटत नाहीत, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी व्यक्त केले. आंदोलने ही राजकीय स्वार्थाची हत्यारे बनून समाजात फूट निर्माण करू शकतात, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नागपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक शस्त्रपूजनाने झाली.

बांगलादेश, नेपाळ, फ्रान्स आणि अल्बेनियामधील अलीकडील घडामोडींचा संदर्भ देत सरसंघचालक म्हणाले की, स्वतःचे हितसंबंध जोपासणाऱ्या शक्ती राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी राजवट बदलाचा मार्ग वापरतात, मात्र त्याचे अपेक्षित परिणाम क्वचितच साध्य होतात. राजवट बदलल्याने परिस्थिती बदलेल असा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात तसे कधीही घडलेले नाही, असे ते म्हणाले.

'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचे स्पष्ट करत, हे राष्ट्रीय गीत पूर्ण गाण्याबाबत मनात कोणतीही संकोच किंवा आक्षेप असू नये, असे ते म्हणाले. 'वंदे मातरम्'ने बंगालची फाळणी करण्याचा कट हाणून पाडला होता आणि आजही ते राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक प्रभावी प्रेरणा म्हणून काम करत आहे, असे ते म्हणाले. हे आपले राष्ट्रीय गीत आहे, आणि ते पूर्ण अभिमानाने, मोठ्या व स्पष्ट आवाजात गाण्याबाबत कोणतीही संकोच किंवा आक्षेप नसावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विजयादशमीच्या भाषणाचा गौरव केला. हे भाषण सामाजिक एकता, आत्मनिर्भरता आणि समाजाचे चारित्र्य बळकट करणे यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य करणारे आणि अत्यंत प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

भारताला कमकुवत करण्याचे प्रयत्न

एक मजबूत भारत अशा शक्तींच्या मार्गात अडथळा ठरू शकतो, म्हणूनच भारताला कमकुवत व विभक्त करण्याचे प्रयत्न केले जातात. काही जागतिक शक्ती भारताचा विकास इच्छितात, परंतु भारताने त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याइतके शक्तिशाली व्हावे, असे त्यांना वाटत नाही. लोकशाहीत आंदोलने अपरिहार्य असली तरी त्यांचा उद्देश सामाजिक दुरी वाढवण्याऐवजी समस्या सोडवण्याचा असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलने जनहिताऐवजी इतर उद्दिष्टांनी प्रेरित असतील तर ती राजकीय स्वार्थाची साधने बनतात आणि व्यक्ती, गट किंवा विचारसरणीबद्दल द्वेष निर्माण करतात, असे ते म्हणाले.

‘हिंदू’ संकल्पना

भारताची राष्ट्रीय एकता ही परस्पर व्यवहारावर नाही तर भावनिक बंधांवर आधारलेली आहे. असे सांगत भागवत म्हणाले की, आपण सर्व भारतीय एक आहोत आणि आपले ऐक्य हृदयाचे ऐक्य आहे. देशातील संस्थांवरील विश्वास डळमळीत करण्यासाठी काही शक्ती सामाजिक भेदभावाचा आणि पीडित भावनेचा गैरवापर करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Uddhav Thackeray Dussehra Rally : सत्ता परिवर्तनासाठी सज्ज व्हा, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Eknath Shinde Dussehra Rally: भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले

राष्ट्रीय हितासाठी एकत्र यावे; पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

अबुआ दिशुम, अबुआ राज तरीही उलगुलान!

बीजिंगसाठी रशियन वेसण