मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आवश्यक निधी ४ नोव्हेंबरपर्यंत न दिल्यास ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवून सरकारच्या अर्थ खात्याचा निषेध करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने दिला आहे. एसटीने सवलत मूल्याची थकबाकी, दैनंदिन खर्चासाठी आवश्यक अतिरिक्त निधी आणि दिवाळी भेटीची रक्कम देण्याची मागणी केली आहे. ही रक्कम ३ नोव्हेंबरपर्यंत न मिळाल्यास ४ नोव्हेंबर रोजी हे निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
एसटीने सरकारकडे निधीची मागणी केल्यानंतर अर्थ खात्याकडून वारंवार त्यात मिठाचा खडा टाकण्यात येत असल्याचा आरोप संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. सरकारच्या या भूमिकेच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी खारट करणाऱ्या अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
एसटीने सप्टेंबर महिन्याचे वेतन आणि थकीत देणी भागविण्यासाठी सरकारकडे १,०१५ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, सरकारने केवळ ३८०.०६ कोटी रुपये दिल्याने महामंडळाच्या आर्थिक अडचणी वाढतील, असा दावा त्यांनी केला.