मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार, नेमून दिलेल्या कामातील हलगर्जीपणा, कुचराई आदी आरोप लाऊन आरोपपत्रे दिलेल्या ४० पेक्षा जास्त दोषी अधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकार्यांनी शिक्षा दिल्या आहेत. यातील काही अधिकाऱ्यांना राज्यभरात, त्यातील काहीना मध्यवर्ती कार्यालयात महत्त्वाच्या पदांवर बढती देण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.
एसटी महामंडळाच्या विशेषतः मध्यवर्ती कार्यालयात महत्त्वाच्या विभागांमध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या संधी मिळाल्याने सक्षम प्राधिकाऱ्यांचे निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रशासनातील शिस्त व आवेदन पद्धतीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असे संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी स्पष्ट केले आहे.
एसटी महामंडळातील ४० अधिकाऱ्यांना गंभीर प्रकरणांमध्ये आरोप लाऊन चौकशी किंवा शिस्तभंगाच्या कारवाईच्या कक्षेत आणले मात्र बढती देताना त्यांना किरकोळ शिक्षा दिल्या आहेत. तर दोषी ठरवून अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अहवालात लावलेली गैरव्यवहाराची कलमे दुर्लक्षित करण्यात आली आहेत.
फेरआढावा घ्या!
एसटीत ५० रुपयांच्या किरकोळ अपहारासाठी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. मग भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना अभय का देण्यात आले आहे असा प्रश्न उपस्थित करून राज्याचे परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी लक्ष घालून निर्दोष ठरवलेल्या अधिकाऱ्यांची प्रकरणे पुन्हा तपासून त्यात्या स्थरावरील सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पुनर्विलोकन करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.