मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरसाठी पुणे-मिरज-हुबळी मार्गाला प्राधान्य द्यावे; पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना थेट लाभ मिळणार संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरसाठी पुणे-मिरज-हुबळी मार्गाला प्राधान्य द्यावे; पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना थेट लाभ मिळणार

मुंबई-बंगळुरू दरम्यान प्रस्तावित वंदे भारत स्लीपर रेल्वेच्या मार्गावरून रेल्वे प्रशासनात मतमतांतरे सुरू आहेत. पुण्यानंतर ही गाडी सातारा-कराड-सांगली-मिरज-बेळगाव-धारवाड-हुबळीमार्गे बंगळुरूला नेण्यात यावी की दौंड-सोलापूर-गुंतकलमार्गे, यावर चर्चा सुरू आहे.

रामभाऊ जगताप

कराड : मुंबई-बंगळुरू दरम्यान प्रस्तावित वंदे भारत स्लीपर रेल्वेच्या मार्गावरून रेल्वे प्रशासनात मतमतांतरे सुरू आहेत. पुण्यानंतर ही गाडी सातारा-कराड-सांगली-मिरज-बेळगाव-धारवाड-हुबळीमार्गे बंगळुरूला नेण्यात यावी की दौंड-सोलापूर-गुंतकलमार्गे, यावर चर्चा सुरू आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या, व्यापारी महत्त्व आणि विद्यमान रेल्वे सुविधांचा विचार करता पुणे-मिरज-हुबळी मार्गाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

पुण्यापासून पुढे दोन्ही मार्गांवर ब्रॉडगेज रेल्वेमार्ग, विद्युतीकरण, दुहेरी मार्गाचे विभाग, आधुनिक सिग्नलिंग, फलाट, पूल आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या दोन्ही मार्गांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवासी आणि व्यापारी संघटनांकडून होत आहे.

पुणे-सातारा-कराड-सांगली-मिरज-बेळगाव-धारवाड-हुबळी हा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महत्त्वाच्या शहरांना जोडतो.

या मार्गावरून वंदे भारत स्लीपर सुरू झाल्यास सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर परिसरासह बेळगाव, धारवाड आणि हुबळी भागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या मार्गावरील प्रवासी मागणी, व्यापारी उलाढाल आणि भविष्यातील प्रवासी वाढीचा विचार करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य तथा रेल्वे प्रवासी संघटनेचे मार्गदर्शक गोपाळ तिवारी यांनीही पुणे-मिरज-हुबळी मार्गावरूनच प्रस्तावित वंदे भारत स्लीपर सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे.

रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाने दोन्ही मार्गांचा समान निकषांवर वस्तुनिष्ठ तुलनात्मक अभ्यास करून त्याचे निष्कर्ष सार्वजनिक करावेत, अशी मागणीही प्रवासी आणि व्यापारी संघटनांनी केली आहे. पश्चिम महाराष्ट्राला समान संधी देऊन पुणे-मिरज-हुबळी मार्गाचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

पुणे-सोलापूर-गुंतकल मार्गावर मुंबई-बंगळुरू दरम्यान अनेक गाड्या सुरू आहेत. मात्र, पुणे-मिरज-हुबळी मार्गावर मर्यादित गाड्या असून त्यांना मोठी मागणी आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणासाठी रेल्वेने सुमारे ४ हजार ३८० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे या पायाभूत सुविधांचा उपयोग करून याच मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरू करावी.
गोपाळ तिवारी, मार्गदर्शक रेल्वे प्रवासी संघटना

सोलापूर मार्गावर गाड्यांची संख्या अधिक

पुणे-सोलापूर-गुंतकल मार्गावरून मुंबई-बंगळुरू दरम्यान यापूर्वीच अनेक रेल्वेगाड्या धावत आहेत. त्याउलट पुणे-मिरज-हुबळी मार्गावरून मुंबई-बंगळुरूला जाणाऱ्या अजमेर, जोधपूर, गांधीधाम आणि पाँडिचेरी या काही साप्ताहिक गाड्यांवर प्रवाशांचा मोठा भार आहे. या गाड्यांचे आरक्षण अनेकदा महिनोन् महिने उपलब्ध होत नसल्याने या मार्गावर अतिरिक्त जलद रेल्वेसेवेची गरज असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.

दोन्ही मार्गांवर गाड्या सुरू करण्याचा पर्याय

दोन्ही मार्ग तांत्रिकदृष्ट्या सक्षम असतील, तर रेल्वे बोर्डाने मुंबई-बंगळुरू दरम्यान दोन स्वतंत्र वंदे भारत स्लीपर सेवा सुरू करण्याचा पर्यायही विचारात घ्यावा, अशी मागणी होत आहे. अंतिम निर्णय घेताना केवळ अंतर आणि विद्यमान परिचालन पद्धतीचा विचार न करता प्रवासी मागणी, आर्थिक व व्यापारी महत्त्व, प्रमुख शहरांची जोडणी, मार्गाची क्षमता आणि प्रादेशिक विकास यांचा समतोल साधावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

Mumbai Metro 7A : आराखड्यातील चुकीमुळे २६० कोटींचा फटका; सल्लागाराच्या निष्काळजीपणावरून MMRDA वर टीका

मुंबईकरांनो, 'स्वाईन फ्लू' बळावतोय; रुग्णसंख्येत होतेय झपाट्याने वाढ, तीन महिन्यांत ३०९ रुग्णांची नोंद

Mumbai : रेल्वे स्थानक परिसर विकासाचे लक्ष्य; आयुक्त अश्विनी भिडेंचे निर्देश; मुलुंड, भांडूप, कांजूरला दिली भेट

गोवंडीतील पालिका शाळेत बकरी अड्डा; नगरसेवक निखिल व्यास यांचा आरोप