भास्कर जामकर/नांदेड
पावसाने ओढ दिल्याने नांदेड जिल्ह्यातील शेती संकटात सापडली असून, शिवारातील उभी पिके करपली आहेत, तर भूजल पातळी सरासरी ३.५ मीटरने खाली गेल्याने अनेक विहिरी आणि बोअरवेलने तळ गाठला आहे. करपलेली पिके, आटलेल्या विहिरी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर यामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील ७.१३ लाख एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यंदा मात्र पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सरासरी १८.८ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली असून, लोहा, कंधार आणि नायगाव तालुक्यांत ही तूट ४० ते ५० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतीतील कामे कमी झाल्याने ग्रामीण भागातील मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोहा आणि कंधार तालुक्यांतील मजूर रोजगाराच्या शोधात पुणे-मुंबईकडे स्थलांतर करत आहेत. जिल्ह्यात ९.४८ लाख पीकविमा अर्ज असल्याचे सांगितले जात असले, तरी यंदा विमा कंपन्यांकडून सर्वेक्षणाची प्रक्रिया रखडल्याची तक्रार आहे.
शिक्षणावरही दुष्काळाचे सावट
दुष्काळाचा परिणाम ग्रामीण कुटुंबांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचे पडसाद उमटत आहेत. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी जाहीर करण्यात आली असली, तरी आर्थिक अडचणींमुळे काही मुले आई-वडिलांसोबत मजुरीसाठी जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
पाणीटंचाईचे संकट गंभीर
जिल्ह्यातील १३५ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी नोंदवण्यात आली आहे. विष्णुपुरी प्रकल्पात केवळ २८ टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासह कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचे आदेश शासनाने दिल्याचे सांगण्यात येत आहे.
पेरणीचा खर्च वाया; शेतकरी चिंतेत
पेरणीसाठी हजारो रुपये खर्च करूनही पीक हाती न आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. “पेरणीसाठी १५ हजार रुपये खर्च आला; मात्र पीक हातात आले नाही. आता जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न सतावत आहे,” अशी व्यथा पुयणी येथील शेतकरी वामन सोनटक्के यांनी व्यक्त केली.