Nashik : महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश; देवयानी फरांदे म्हणाल्या, "काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी...  
महाराष्ट्र

Nashik : महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश; देवयानी फरांदे म्हणाल्या, "काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी...

नाशिक महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये उबाठा, मनसे व काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रवेश केला. आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रवेशांना विरोध दर्शवल्याने भाजपची अंतर्गत नाराजी उघडकीस आली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. गुरुवारी (दि. २५) जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि मनसेतील काही बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र या पक्षप्रवेशांमुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी उफाळून आली असून, स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि आमदार देवयानी फरांदे यांनी उघड विरोध दर्शवला. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर यतीन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आमदार नितीन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यांच्या प्रवेशानंतर "काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी स्वतःसाठी तिकीट मिळवण्याच्या उद्देशाने या विषयाचं राजकारण केलं." असे म्हणत फरांदे यांनी दुःख व्यक्त केले.

मला गहिवरून आलं, कारण...

माध्यमांशी बोलताना फरांदे म्हणाल्या, “गेल्या चार दशकांत माझ्यावर वैयक्तिक पातळीवर कधी अन्याय झाला, तरी त्यावर मी कधीही सार्वजनिक भूमिका घेतलेली नाही. मी पक्षाची एक निष्ठावान कार्यकर्ती आहे. आज प्रत्येकालाच नेता व्हायचं आहे, प्रत्येक जण स्वतःचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार कोण, हा खरा प्रश्न आहे. एवढाच मुद्दा आहे. मला गहिवरून आलं, कारण मी स्वतःला आजही एक साधी कार्यकर्तीच मानते. माझ्या डोळ्यासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल, तर ते योग्य नाही, असं मला वाटतं,” असे सांगत देवयानी फरांदे यांचे डोळे पाणावले.

पुढे त्या म्हणाल्या, “आज जे नेते पक्षात आले आहेत, वरिष्ठ पदाधिकारी या नात्याने मी त्यांचे स्वागत करते. मात्र, आज पक्षात जे घडलं, ते मला मान्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी...

“जर कुणी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी तो करून पाहावा. मला कोणाचीही भीती नाही. पण या संपूर्ण विषयात पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्या भूमिकेला पाठिंबा देत उभे राहिले असते, तर कार्यकर्त्यांपर्यंत वेगळा आणि सकारात्मक संदेश गेला असता. मी गिरीश महाजन यांच्यावर नाराज नाही. त्यांना चुकीच्या माहितीच्या आधारे ब्रीफ करण्यात आलं आहे. काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी स्वतःसाठी तिकीट मिळवण्याच्या उद्देशाने या विषयाचं राजकारण केलं आहे,” असं फरांदे यांनी सांगितलं. मात्र, हे दलाल नेमके कोण आहेत, याबाबत त्यांनी बोलणं टाळलं.

पक्षप्रवेश झाला तरीही...

“पक्षाच्या दृष्टीने पक्षप्रवेश होणं आणि पक्ष विस्तार करणं आवश्यक असतं. पण पक्ष वाढत असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये. पक्षात आलेल्या सर्वांचं मी स्वागत करते. हा विषय मी वरिष्ठ पातळीवर नक्की मांडणार आहे. माझं गिरीश महाजन यांच्याशी याबाबत बोलणं झालं असून, पक्षप्रवेश झाला असला तरी तिकीट अंतिम झालेलं नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे,” असंही फरांदे यांनी नमूद केलं.

निवडणूक प्रमुख म्हणून मला...

या पक्षप्रवेशांना आमदार देवयानी फरांदे यांनी सोशल मीडियावरून जाहीर विरोध केला होता. “प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या पक्षप्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. हिंदुत्वासाठी संघर्ष करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या मी ठामपणे पाठीशी आहे. निवडणूक प्रमुख म्हणून मला या विषयात कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यांनी केलेल्या पोस्टमुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.

शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

"काल युती झाल्यानंतर पेढे वाटत जल्लोष करणारे आज दुसऱ्या पक्षात जातायेत, तर विश्वास कोणावर ठेवायचा?" अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. त्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे ठाकरे गटात परतण्याचे मार्ग बंद झाले होते. त्यात देवयानी फरांदे यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांचे भाजपमधील दरवाजे बंद होण्याची शक्यता होती. मात्र फरांदे यांच्या विरोधाला झुगारून या नेत्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला.

गिरीश महाजनांना भाजप कार्यकर्त्यांचा घेराव

या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आमदार देवयानी फरांदे यांनी गैरहजेरी लावली होती. मंत्री गिरीश महाजन कार्यालयात येत असताना काही निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेरच त्यांना घेराव घातल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, “भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. मनसे, काँग्रेस आणि उबाठातील अनेक नेते मुख्य प्रवाहात आले आहेत. नाशिकमध्ये आम्ही ८० टक्क्यांहून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”

मात्र, या मोठ्या पक्षप्रवेशांमुळे नाशिकमधील निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपसमोरील अंतर्गत आव्हाने अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Thane : निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाला धक्का; ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या, "तुम्हाला आनंद दिघेंची शपथ...

Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम; महिला प्रवाशांसाठी खास सोय, राईडआधी टिप मागितली तर...

१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी; ३६ चेंडूंमध्ये ठोकले तुफानी शतक, एकाच सामन्यात मोडले दिग्गजांचे रेकॉर्ड्स