नाशिकमधील ‘रिअल इस्टेट’चा विस्तार; वर्षभरात साडेसतरा हजार कोटींचे मालमत्ता व्यवहार 
महाराष्ट्र

नाशिकमधील ‘रिअल इस्टेट’चा विस्तार; वर्षभरात साडेसतरा हजार कोटींचे मालमत्ता व्यवहार

मुंबई आणि पुण्यानंतर वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकमधील ‘रिअल इस्टेट’ क्षेत्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

नाशिक : मुंबई आणि पुण्यानंतर वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकमधील ‘रिअल इस्टेट’ क्षेत्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये शहरात सुमारे १७ हजार ५४३ कोटी रुपयांच्या मालमत्ता व्यवहारांची नोंद झाली असून, नाशिकच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक व्यवहार असल्याचे सांगितले जात आहे.

महापालिकेला मिळालेल्या उपकराच्या माध्यमातून ही आकडेवारी समोर आली आहे. गत आर्थिक वर्षात नाशिक महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता व्यवहारांच्या एक टक्के प्रमाणानुसार १७५.४३ कोटी रुपये जमा झाले आहेत.

२०२४-२५ या आर्थिक वर्षात शहरात १३ हजार ५२९ कोटी रुपयांचे मालमत्ता व्यवहार झाले होते. त्याच्या तुलनेत यंदा सुमारे चार हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये जुन्या आणि नव्या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे.

नाशिकचे संतुलित नागरीकरण, चांगले हवामान, कमी प्रदूषण, सुरक्षित वातावरण, वाहतुकीची सुविधा आणि रोजगाराच्या वाढत्या संधी यामुळे शहराकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. निवृत्तीनंतर वास्तव्य तसेच गुंतवणुकीसाठी नाशिकला पसंती दिली जात असल्याचे बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांकडून सांगण्यात येत आहे.

आगामी काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढती मागणी लक्षात घेता नाशिकमधील रिअल इस्टेट क्षेत्राचा आलेख आणखी उंचावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बांधकाम क्षेत्राला चालना

नाशिकमध्ये अत्याधुनिक गृहप्रकल्पांची संख्या वाढत असून, ‘सेकंड होम’ तसेच मोठ्या घरांची मागणी वाढताना दिसत आहे. ग्राहकांकडून थ्री आणि फोर बीएचके सदनिकांना अधिक पसंती दिली जात आहे. बांधकाम सुरू असतानाच घर बुक करण्याऐवजी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ताबा घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबई आणि पुण्यातील अनेक नागरिक गुंतवणुकीच्या दृष्टीने नाशिकमध्ये घर खरेदीला प्राधान्य देत आहेत. तसेच शहरात उंच इमारतींच्या बांधकामांना परवानगी मिळत असल्याने बांधकाम क्षेत्राला चालना मिळत आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार; हायकोर्टाचा मुलाला दणका

Mumbai : कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा निष्कर्ष; ६ पैकी १ कोलोरेक्टल कॅन्सर रुग्णामध्ये आढळला लिंच सिंड्रोम

कशेडी बोगद्यातील ९० टक्के पाण्याची गळती नियंत्रित; राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेणचे स्पष्टीकरण

Satara : पाचगणीतील ताईघाट वाहनतळ परिसरात बिबट्याची दहशत; वनविभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Raigad : रेवदंडा चिखलाच्या विळख्यात; यंदाही गणेश विसर्जन धोक्यात, भाविकांच्या जिवाशी खेळ सुरूच