महाराष्ट्र

नसरापूर प्रकरणाचा तपास SIT कडे; आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी; खटला फास्ट ट्रैक कोर्टात चालणार, राज्य सरकारकडून कुटुंबाला लेखी हमी

भोर तालुक्यातील नसरापूर येथील चार वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला पुणे न्यायालयाने ७मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.

नवशक्ती Web Desk

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथील चार वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला पुणे न्यायालयाने ७मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.

या पथकात पुणे ग्रामीण पोलिसांमधील सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. जनक्षोभइतका तीव्र होता की, शनिवारी संतप्त नागरिकांनी पुणे येथील नवले पूल परिसरात रास्ता रोको आंदोलन करत बंद पाळला होता. नागरिकांच्या भावना आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. एसआयटीमार्फत पुराव्यांची साखळी भक्कम करून आरोपीला कठोर कायदेशीर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्यचार करुन निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेनंतर नसरापूरात संतप्त पडसाद उमटले. ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करुन शनिवारी बंद पाळला. शनिवारी सायंकाळी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक चार तास ठप्प झाली होती. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक आणि पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी केली होती. या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवले आणि रस्ता मोकळा केला. मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही लाठीचार्ज झालाच नसल्याचे म्हटले आहे.

चिमुकलीचा मृतदेह नवले पुलावर आणून नातेवाईकांनी ठिय्या मांडला. "जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत हटणार नाही," असा निर्धार आंदोलकांनी केल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मृत मुलीच्या आई-वडिलांना पोलिसांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी समजावून तेथून बाहेर काढल्यावर पीडित चिमुकलीच्या पार्थिवावर शनिवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण परिसरात अद्यापही तणावपूर्ण शांतता असून, नागरिकांकडून आरोपीला भरचौकात फाशी देण्याची मागणी केली जात आहे.

महिला आयोगाकडून गंभीर दखल

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून हे कृत्य केवळ घृणास्पद नाही, तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे, असे राष्ट्रीय महिला आयोगाने नमूद केले. या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीने सुनावणी व्हावी, असे निर्देश महिला आयोगाने दिले. "हे कृत्य केवळ घृणास्पद नाही, तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचे गंभीर उल्लंघन असून समाजाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. या अमानवीय गुन्ह्याने संपूर्ण देशात वेदना व संताप निर्माण झाला आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणात तातडीने संज्ञान घेण्याचे व तपासावर बारकाईने देखरेख ठेवावी. त्याचबरोबर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आवश्यक ती कायदेशीर पावले उचलण्यात यावीत," असे निर्देशही राष्ट्रीय महिला आयोगाने दिले आहेत.

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात

नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी राज्य सरकार कायद्यातील कोणतीही पळवाट न ठेवता हा खटला 'फास्ट ट्रॅक' वर चालवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. "जलदगतीने न्याय देण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने पीडितेच्या कुटुंबाला लेखी पत्र देण्यात आले आहे. काही लोक शनिवारी रात्री झालेल्या आंदोलनाचा फायदा घेऊन याला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

किरकोळ भांडणातून मला गोवले : आरोपीचा दावा

सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी मला 'भांडणातून गोवल्याचा' धक्कादायक बनाव रचला. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला 'काही तक्रार आहे का?' अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे उत्तर देत म्हटले की, “किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे.” आपल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. मात्र पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत त्याला पोलीस कोठडीत पाठवले.

राजकारण्यांनो, सांत्वनाला येऊ नका

"माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे की, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्याने आमच्या घरी भेटायला येऊ नये. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कुणी लोकं आहेत, त्यांना आम्हाला भेटायचं असेल तेव्हा भेटू. मात्र तोपर्यंत कोणत्याही नराधमाने माझ्या सांत्वनासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे,” अशी भूमिका पीडितेच्या वडिलांनी घेतली आहे.

ममता X मोदी लढाईचा आज निर्णायक फैसला; पाच विधानसभांची मतमोजणी; तमिळनाडू, केरळकडेही सर्वांचे लक्ष

पाच राज्यांचा आज निवडणूक निकाल; बाजाराची दिशा ठरणार, वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमतींबाबत प्रतिसाद अपेक्षित

प्रदेश काँग्रेसची दमछाक !

मे महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ४ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत