महाराष्ट्र

तारीख पे तारीख! ‘घड्याळ’ चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांब‌णीवर, सुप्रीम कोर्टाने दिली 'ही' तारीख

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाला ‘घड्याळ’ हे चिन्ह आणि पक्षाचे मूळ नाव दिल्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. घड्याळ चिन्हाबाबत मंगळवारी सुनावणी होणार होती, पण ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्ष आणि चिन्ह याबाबतचा वाद सुप्रीम कोर्टात अद्यापही सुटू शकलेला नाही. प्रत्येक वेळी ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाला ‘घड्याळ’ हे चिन्ह आणि पक्षाचे मूळ नाव दिल्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. घड्याळ चिन्हाबाबत मंगळवारी सुनावणी होणार होती, पण ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता सुप्रीम कोर्टात १५ ऑक्टोबर रोजी ही सुनावणी होणार आहे.

येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर दिवाळीनंतर विधानसभेसाठी मतदान होईल, असे बोलले जाते. त्यामुळे घड्याळ चिन्हाबाबतच्या सुनावणीला महत्त्व आले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४०पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन भाजप-शिंदेंसोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस या मूळ पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानंतर या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे.

निवडणुकीपूर्वी प्रकरण निकाली काढण्यासाठी शरद पवार गट आग्रही

२५ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वकिलांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रकरण निकाली काढण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता आणि उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी १ ऑक्टोबरला निश्चित केली होती. त्यानुसार या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतानाच, ही सुनावणी आता १५ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या सुनावणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्ह कायम राहणार की पुन्हा नवीन चिन्ह मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.

जून महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रीम कोर्टाने काही अटींवर अजित पवार गटाला ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यास परवानगी दिली होती. दरम्यान, आता सुप्रीम कोर्ट ‘घड्याळ’ चिन्हाबाबत कोणता निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!