पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपर कसा फोडला गेला हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. नीटच्या पेपर फुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी धरुन अतिशय सुनियोजितपणे आखल्याचे सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. त्यासाठी मोटेगावकरने सर्वात आधी त्याच्या क्लासमधे काम करणाऱ्या पीव्ही कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर वर्णी लावून घेतली. सोबत मनीषा मांढरे हीची देखील एनटीएच्या पॅनलवर वर्णी लावण्यात आली. कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि त्या मोटेगावकरपर्यंत पोहोच करणार अशी सोय करण्यात आली.
वर्षानुवर्षे अध्यापनाचे काम केल्याने पी व्ही कुलकर्णीने केमिस्ट्रीच्या तर मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तोंडपाठ केले. एनटीएमध्ये प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी त्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न तोंडपाठ केले. त्यानंतर ते हाताने लिहून काढून मोटेगावकरला पाठवले. मोटेगावकरने ते पीडीएफच्या स्वरुपात स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवले आणि पुढे पैशांच्या बदल्यात त्यांची विक्रि केली. ३ मे रोजी परिक्षा पार पडल्यावर मोटेगावकरने मोबाईलमधून ते डिलीट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीबीआयने मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला आणि मोटेगावकरला अटक झाली.
कार्यालय सील
दरम्यान, शिवराज मोटेगावकर याच्या जंगली महाराज रस्त्यावरील डेक्कन जिमखाना परिसरात असलेल्या आरसीसी पॅटर्न कोचिंग क्लासला महापालिकेच्या बांधकाम विभागाने बुधवारी सील ठोकले. बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या या क्लासवर झालेल्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बोरावके इमारतीमध्ये हे आरसीसी क्लासेस सुरू होते. मात्र, ज्या इमारतीत हे वर्ग भरवले जात होते, त्या इमारतीला अद्याप महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेले नव्हते. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेले अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्रही या क्लासकडे नव्हते. या गंभीर त्रुटी असूनही तिथे बेकायदेशीररीत्या क्लासेसचे कामकाज राजरोसपणे सुरू होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते हेमंत संभूस यांनी २३ मार्च रोजी यासंदर्भात महापालिककडे लेखी तक्रार केली होती. या इमारतीवर तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकत कर थकीत असल्याची बाबही समोर आली आहे. या तक्रारीची दखल घेत महापालिका बांधकाम विभागाने संबंधित जागामालकाला यापूर्वी नोटीस बजावली होती आणि क्लासेस बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, महापालिकेच्या या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून क्लासेस सुरूच ठेवण्यात आले होते. अखेर महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर बुधवारी महापालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाई केली.
लातूरमध्ये डॉक्टरची चौकशी
रविवारी दुपारपासून लातूरमध्ये दाखल झालेले सीबीआयचे पथक अद्याप शहरातच तळ ठोकून आहे. विविध ठिकाणी तपास आणि माहिती संकलन सुरू आहे. बुधवारी दिवसभर सीबीआयचे अधिकारी उद्योग भवन परिसरातील आरसीसीच्या मुख्य कार्यालयात तपास करत होते. त्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास हे पथक औसा रोडवरील एका खासगी रुग्णालयात पोहोचले. फुटलेला नीट पेपर विकत घेतल्याचा संशय असलेल्या एका बालरोग तज्ज्ञाची तब्बल साडेचार तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल डेटा तसेच डिजिटल पुरावे सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पथक पुन्हा रवाना झाले. दरम्यान, उद्या आणखी काही ठिकाणी सीबीआयकडून छापे आणि चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरोपी न्यायालयीन कोठडीत
दरम्यान, दिल्लीतील एका न्यायालयाने नीट पेपरफुटी प्रकरणात मंगिलाल खटीक, विकास बिवाल, दिनेश बिवाल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांना २ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. तर, आरोपी शुभम खैरनारची सीबीआय कोठडी पुढील चौकशीसाठी पाच दिवसांनी वाढवण्यात आली आहे. एजन्सीने इतर दोन आरोपी मनीषा मांढरे आणि शिवराज मोटेगावकर यांच्या स्वाक्षरीचे नमुने घेण्याची परवानगीही न्यायालयाकडे मागितली.