पुणे - देशभरातील २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने सोमवारी मोठी कारवाई केली. लातूर आणि नांदेड येथील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला तब्बल ११ तासांच्या कसून चौकशीनंतर सीबीआयने अटक केली. त्याला नऊ दिवस ‘सीबीआय’ कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले. मोटेगावकर याची प्रवासी कोठडी मिळवण्यात आली असून, पुढील तपासासाठी त्याला तपासासाठी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात नेण्यात येणार आहे.
मोटेगावकरच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील मोठ्या शैक्षणिक माफियांशी जोडले गेल्याचे स्पष्ट झाले असून, या अटकेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील ही एकूण दहावी अटक असून, पुण्यातून आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सीबीआयने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर याच्याकडे परीक्षेच्या १० दिवस आधीच म्हणजेच २३ एप्रिल २०२६ रोजी नीटची प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरे उपलब्ध होती. ३ मे रोजी होणारी मुख्य परीक्षा सुरू होण्यापूर्वीच त्याच्या मोबाईलवर हे प्रश्न आढळून आले होते. तपासात असेही समोर आले आहे की, त्याने ही प्रश्नपत्रिका विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला आणि अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मोबदल्यात पुरवली होती. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने परीक्षा संपल्यानंतर मोबाईलमधील प्रश्नपत्रिका आणि तांत्रिक माहिती हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र सीबीआयने डिजिटल पुराव्यांच्या आधारे त्याला अटक केली.
या प्रकरणाचा सखोल तपास करताना सीबीआयला मोटेगावकरच्या बँक खात्यात विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. नांदेड येथील एका पालकाने आपल्या मुलीसाठी पाच लाख रुपयांत हा पेपर विकत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. मोटेगावकर हा पेपर फोडणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य असून त्याने लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे सांगण्यास तपासादरम्यान टाळाटाळ केली. यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरे आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संगनमत करून त्याने हे रॅकेट चालवले होते असा संशय आहे.
मोटेगावकरच्या अटकेमागे एक जुना व्हिडिओ केंद्रस्थानी असल्याचे तपासात समोर आले आहे. आपण दिलेल्या ४२ प्रश्नांची संभाव्य प्रश्नपत्रिका नीट परीक्षेच्या पेपरशी तंतोतंत जुळली होती असा दावा त्यात तो करताना दिसत आहे. स्वतः मोटेगावकरनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्याने सीबीआयचा संशय बळावला आणि तपासाची चक्रे त्यांच्या दिशेने फिरली.
पुण्यातील सीबीआय कार्यालयात काल रात्रीपासूनच मोठी हालचाल पाहायला मिळत होती. मोटेगावकरसोबत काही डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचीही कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान सीबीआयच्या हाती काही धक्कादायक पुरावे लागले आहेत, ज्यामध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार, आधार कार्ड आणि पॅन कार्ड्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ज्या लिंकच्या आधारे हा पेपर लीक करण्यात आला होता, त्या लिंकची माहिती सीबीआयला मिळाली आहे; मात्र पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तो पेपर आता डिलीट करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाची व्याप्ती पाहता, हे केवळ स्थानिक रॅकेट नसून एक मोठी आंतरराज्य साखळी असल्याची शक्यता सीबीआयने वर्तवली आहे. या गुन्हेगारी साखळीमध्ये देशभरातील विविध शहरांमधील कोचिंग क्लासेसचे चालक एकत्र आल्याची माहिती समोर येत आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून दिल्ली आणि पुणे सीबीआयचे पथक संयुक्तपणे तपास करत आहेत. मोटेगावकरच्या संपर्कात आणखी कोणकोणते मोठे चेहरे आहेत, हे शोधण्यासाठी त्यांचा मोबाईल फोन आणि सोशल मीडिया खाती सीबीआयने आपल्या ताब्यात घेतली आहेत.
मनीषा मांढरे निलंबित
पुणे - नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या मनीषा मांढरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने
मांढरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मनीषा मांढरे यांना नीट २०२६ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात अटक होणे ही बाब अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निंदनीय असून शिक्षण क्षेत्राच्या प्रतिमेला बाधा पोहोचवणारी आहे. या प्रकाराची संस्था व महाविद्यालय स्तरावर गांभीर्याने दखल घेऊऩ ही कारवाई करण्यात आली.
अशी झाली भरभराट :
रसायनशास्राचा प्राध्यापक म्हणून मोटेगावकरने सुरुवात केली. १९९० च्या दशकात त्याने या विषयाच्या शिकवण्या सुरू केल्या. त्यावेळी तो अक्षरशः सायकलवरून फिरत असे. नंतर त्याने आपल्या कोचिंग क्लासचा झपाट्याने विस्तार केला. सध्या नीट, जेईई तसेच सीईटी परीक्षांसाठी त्याच्या क्लासमधून मार्गदर्शन केले जात होते. मराठवाड्याप्रमाणेच कोल्हापूर व पुण्यातही क्लासच्या शाखा उघडल्या होत्या. त्याची उलाढाल सुमारे १०० कोटी असावी, असा अंदाज आहे.
आरसीसी क्लासेसची जाहिरात 'डॉक्टर घडवण्याची फॅक्टरी' अशी केली जायची आणि त्यांच्या मॉक टेस्टमध्ये येणारे प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेत विचारले जात असल्याने विद्यार्थ्यांचा त्यांच्यावर मोठा विश्वास होता. मात्र, आता हा सर्व प्रकार एका नियोजित कटाचा भाग असल्याचे सीबीआयच्या कारवाईतून समोर आले आहे.
एनटीए प्रमुखांना समन्स
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षणविषयक संसदीय स्थायी समितीने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचे (एनटीए) अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी यांना समन्स बजावले आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत समितीने या प्रकरणाच्या तपासाचा सद्यस्थितीचा अहवाल मागवला आहे.