हारुन शेख/लासलगाव
अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम देशातील कांदा निर्यातीवर होत असून आखाती देशांमध्ये होणारी कांद्याची निर्यात गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याचे तुलनेत या वर्षी सुमारे ४५ टक्क्यांनी घटल्याची माहिती समोर आली आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे कंटेनर वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने निर्यात मंदावली असताना “हम भी किसीसे कम नही” अशी भूमिका कांदा निर्यातदारांनी घेत मार्च २०२६ मध्ये अंदाजे ३५० कंटेनरद्वारे आखाती देशांमध्ये कांद्याची निर्यात केली. मात्र मार्च २०२५ मध्ये हीच निर्यात सुमारे ६०० कंटेनरपर्यंत झाली होती. एकूण जागतिक स्तरावरही कांदा निर्यात सुमारे ४५ टक्क्यांनी घटल्याची माहिती कृषीमाल निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले.
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांदा निर्यात घटल्याचा थेट परिणाम लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याच्या दरावर दिसून आला. मार्च २०२६ मध्ये उन्हाळी कांद्याला जास्तीतजास्त १५०० रुपये प्रति क्विंटल तर लाल कांद्याला १४१७ रुपये असा दर मिळाला. याउलट मार्च २०२५ मध्ये उन्हाळी कांद्याला २६२७ रुपये आणि लाल कांद्याला ३१०१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाले होते. कांदा दरातील निम्म्याहून अधिक मोठ्या घसरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कांद्याच्या सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघत नाही. मुलांचे शिक्षण, लग्न व घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने आखाती देशांसह नवीन बाजारपेठा शोधून कांदा निर्यात वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक शेतकरी
लासलगावसह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच युद्धामुळे निर्यात घटली आहे. देशांतर्गत वाहतुकीसाठी रेल्वे मालगाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी रेल्वे विभागाशी सातत्याने पाठपुरावा सुरू असून परदेशात कांदा निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडेही लासलगाव बाजार समितीच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे.ज्ञानेश्वर जगताप, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव