पुढचे ‘लक्ष्य’: शरद पवार गट; आता राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’ची शक्यता 
महाराष्ट्र

पुढचे ‘लक्ष्य’: शरद पवार गट; आता राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’ची शक्यता

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संसदीय पक्षातील फूट यशस्वी केल्यानंतर आता पुढील लक्ष्य हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असणार आहे.

Swapnil S

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संसदीय पक्षातील फूट यशस्वी केल्यानंतर आता पुढील लक्ष्य हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असणार आहे. या गटाचे राजकीय ऑपरेशन करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर दिली जाण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाच्या ८ पैकी किमान सहा खासदारांना गळाला लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे लोकसभेतील दोन तृतीयांश संख्याबळ सिद्ध करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिवसेना ठाकरे गटात फूट पाडण्यात आली. त्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली. ही फूट कायद्याच्या कसोटीवर टिकल्यानंतर लगेचच शरद पवार गटाच्या खासदारांना वळविण्याचे प्रयत्न होणार आहेत. हे प्रयत्न अजित पवार गटाच्या नेत्यांमार्फत होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकसभेत आठ खासदार आहेत.त्यात सुप्रिया सुळे (बारामती), अमोल कोल्हे (शिरूर), नीलेश लंके (अहिल्यानगर), भास्कर भगरे (दिंडोरी), धैर्यशील मोहिते-पाटील (माढा). बजरंग सोनावणे (बीड), सुरेश म्हात्रे (भिवंडी) आणि अमर काळे (वर्धा) यांचा समावेश आहे. यापैकी सुळे आणि कोल्हे वगळता अन्य खासदार शरद पवार गटाची  साथ सोडू शकतात किंवा कसे याची चाचपणी सध्या सुरु आहे. ही चाचपणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मोहिमेला वेग दिला जाण्याची शक्यता आहे.

भाजपच्या पाठबळाने  लोकसभा खासदारांमध्ये  फूट पाडण्याचे प्रयत्न  होऊ शकतात याची कल्पना शरद पवारांना आहे. त्यादृष्टीने पवार यांनी संभाव्य राजकीय संकटाला तोंड देण्याची तयारी केल्याचे समजते. याशिवाय पक्षाचे नेते खासदारांच्या संपर्कात असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

एमडीची ‘डिलिव्हरी’ होण्याआधीच दणका; कोपरीत २.३० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त, गोवंडीतील तरुण पोलिसांच्या जाळ्यात

माथेरानचा एकमेव रस्ता ठरतोय पर्यटकांसाठी ‘कोंडीचा सापळा’; नेरळ-माथेरान ८ किमीच्या प्रवासाकरिता ५-६ तासांची प्रतीक्षा

मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा वाढता धोका; तीन महिन्यांत मलेरिया ३,१७७, लेप्टोचे १८९ रुग्ण