‘रेटकार्ड’ बंधनकारक; खासगी रुग्णालयांत दर्शनी भागांत दरपत्रक लावणे आवश्यक, नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

‘रेटकार्ड’ बंधनकारक; खासगी रुग्णालयांत दर्शनी भागांत दरपत्रक लावणे आवश्यक, नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

खासगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतताना, बिल पाहिल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना धक्काच बसतो.

Swapnil S

मुंबई : खासगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतताना, बिल पाहिल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना धक्काच बसतो. कारण डॉक्टर किती बिल आकारतील, याचा कोणताही भरोसा नसतो. आता रुग्णालयांच्या दर्शनी भागात प्रत्येक उपचारासाठी किती खर्च येणार आहे, याचा तपशील लावणे सरकारने बंधनकारक केले आहे. त्यामुळे रुग्णांची होणारी संभाव्य फसवणूक टळणार आहे.

राज्यातील खासगी रुग्णालयांना उपचार, तपासण्या आणि विविध वैद्यकीय सुविधांचे दर मराठी आणि इंग्रजी भाषेत ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले. दरपत्रक लपवणे किंवा शुल्काबाबत संदिग्धता ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे.

महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायदा आणि नियमावली २०२१ मधील अनुसूची ३ नुसार वैद्यकीय सेवा आणि रुग्णालयातील सुविधांचे दर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचाराच्या संभाव्य खर्चाचा अंदाज येणार असून, वैद्यकीय खर्चाचे नियोजन करणे आणि बिलाबद्दल अनावश्यक वाद टाळणे शक्य होणार आहे. मुंबई शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय आस्थापनांनी लागू असलेल्या नियमांनुसार सेवा तसेच सुविधांचे दरपत्रक रुग्णालयाच्या आवारात सहज दिसेल आणि वाचता येईल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. हे दरपत्रक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत असावे. दरांमध्ये बदल केल्यास सुधारित दरपत्रक तातडीने प्रदर्शित करावे लागणार आहे.

दरांबाबत रुग्णांना पुरेशी माहिती देणे गरजेचे

रुग्णालयांनी सेवा शुल्क, विविध उपचार पॅकेजेस आणि त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दरांबाबत रुग्णांना पुरेशी माहिती द्यावी. नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष आणि बिलिंग काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना दरपत्रक तसेच शुल्काबाबत योग्य मार्गदर्शन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे बिलांबाबत निर्माण होणारा संभ्रम आणि तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.

परदेशी रुग्णांसाठीही पॅकेज दर

वैद्यकीय व्हिसा किंवा आयुष व्हिसावर भारतात उपचारांसाठी येणाऱ्या परदेशी रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालयांनी त्यांच्यासाठी लागू असलेले विशेष उपचार पॅकेजचे दरही स्पष्टपणे प्रदर्शित करावेत, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘जंतरमंतर’ ते ‘आयफेल टॉवर’!

आजचे राशिभविष्य, १७ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Navratri 2026 : उपवासासाठी बनवा राजगिऱ्याचे पराठे; जाणून घ्या सोपी रेसिपी

Skin Care : चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचा उजळते का? करीना-करिश्माच्या सवयींबाबत तज्ज्ञ सांगतात...

Navratri 2026 : हिरवी माहेश्वरी साडी, लक्ष्मी साज अन् मराठमोळा थाट; जुई गडकरीचा मनमोहक लूक चर्चेत