बारामती : एमपीएससीची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचे बारामतीतील एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबीयांच्या संमतीने विवाहही ठरला. मात्र, लग्न ठरल्यानंतर काही दिवसांनी तरुणीच्या वागण्यात अचानक बदल झाला. प्रियकर शारीरिक संबंधांसाठी आग्रह करीत असून काही गोळ्या देत असल्याचे तिने मैत्रिणीला सांगितल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.६) प्रियकरासोबत बाहेर गेलेल्या या २३ वर्षीय तरुणीचा त्याच दिवशी रात्री अचानक मृत्यू झाला. या घटनेनंतर आईने व्यक्त केलेल्या संशयावरून प्रियकर अथर्व राजेंद्र मेहन (वय २७, रा. बारामती) याच्याविरुद्ध बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात एमपीएससीचा अभ्यास, तिथेच जुळले प्रेमसंबंध
बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑक्टोबर २०२५ मध्ये पुण्यात गेली होती. याच काळात तिची अथर्वसोबत ओळख झाली आणि पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. डिसेंबरमध्ये ही माहिती तरुणीच्या मैत्रिणीकडून तिच्या आईला समजली.
मुलीच्या नात्याबाबत माहिती मिळाल्यानंतर आईने तिच्याशी संवाद साधला. ३० डिसेंबर रोजी आई आणि तिचा भाऊ पुण्यात गेले आणि तिला बारामतीला घेऊन आले. त्यावेळी तरुणीने अथर्वसोबतच लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी चर्चा करून या विवाहाला संमती दिली. १२ एप्रिल रोजी दोन्ही कुटुंबीयांची भेटही झाली होती.
लग्न ठरलं, पण तरुणीच्या वागण्यात बदल
कुटुंबीयांनी लग्नाला होकार दिल्यानंतर दोघांची भेट सुरूच होती. फोनवरूनही त्यांच्यात नियमित संपर्क होता. मात्र, घटनेच्या काही दिवस आधी तरुणी पूर्वीसारखी बोलत नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. ती शांत आणि काहीशी अस्वस्थ दिसत असल्याने आईने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली.
मैत्रिणीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व तरुणीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. तसेच तो तिला काही गोळ्या देत असल्याचेही मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
६ ऑगस्टला दोघे एकत्र बाहेर पडले
या प्रकरणातील महत्त्वाची घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. दुपारी साडेबारा वाजता अथर्व कारमधून तरुणीला एमबीए प्रवेशाच्या कामासाठी टी.सी. कॉलेज येथे घेऊन गेला. दुपारी चारच्या सुमारास तरुणीने आईला मेसेज करून प्रवेश फीबाबत माहिती दिली. त्यावेळी अथर्वच्या आई आणि मावशीला सोडण्यासाठी जात असल्याचेही तिने सांगितले.
आईने व्हिडीओ कॉल केल्यावर तरुणी अथर्वसोबत त्याच्या कारमध्ये असल्याचे दिसले. मात्र, सायंकाळनंतर तिच्याशी संपर्क होण्यात अडचणी येऊ लागल्या. सुमारे सात वाजता आईने फोन केला असता तरुणीने तो उचलला नाही. त्यानंतर अथर्वच्या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर आईचे मुलीशी बोलणे झाले.
आईला फोनवर काय सांगितलं?
या संभाषणादरम्यान तरुणीने अथर्व तिला घरी घेऊन जाणार असल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारीत आहे. त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असून तो तिला गोळी देणार असल्याचेही तिने आईला सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुलीचे बोलणे ऐकल्यानंतर आईने तिला अथर्वच्या घरी जाऊ नये आणि परत घरी येण्यास सांगितले. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास आईने पुन्हा मेसेज केला. त्याला तरुणीने आपण जेवत असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर मात्र तिच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.
काही वेळातच रुग्णालयात नेलं, पण...
रात्री दहाच्या सुमारास आईने पुन्हा फोन केला. यावेळी अथर्वने फोन उचलला. तरुणीला चक्कर आल्याचे सांगून आपण तिला घेऊन येत असल्याचे त्याने कळविले.
यानंतर अथर्व तरुणीला घेऊन आईच्या घरी आला. प्रकृती बिघडल्याने तिला प्रथम देवकाते हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर गिरीराज हॉस्पिटल आणि पुढे सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
आई रात्री सुमारे १०.२० वाजता सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेथे तरुणी स्ट्रेचरवर असल्याचे दिसले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याची माहिती आईला मिळाली.
आईच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तपास
मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने आईने या प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून अथर्व राजेंद्र मेहन याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, तिने घेतलेल्या गोळ्यांचा आणि तिच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, तसेच घटनेच्या दिवशी नेमके काय घडले, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील तपास करीत आहेत.