महाराष्ट्र

पुण्याच्या मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरण: आरोपी शीतल तेजवानीला अटक; आज न्यायालयात करणार हजर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीला पुण्यातील मोक्याची १८०० कोटी रुपयांची जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांत विकल्याच्या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. शीतल तेजवानीला बुधवारी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. चौकशीत तिचा सहभाग निश्चित झाल्याने तिला अटक करण्यात आली.

Krantee V. Kale

पुणे : मुंढवा येथील कोट्यवधीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली आहे. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीला पुण्यातील मोक्याची १८०० कोटी रुपयांची जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांत विकल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजले होते. या प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर या तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. शीतल तेजवानी यांनी ३०० कोटींच्या जमिनीच्या व्यवहारापोटी पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीकडून एक छद्दामही न घेता, थेट खरेदीखत केल्याचे समोर आले होते.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. शीतल तेजवानीला बुधवारी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. चौकशीत तिचा सहभाग निश्चित झाल्याने तिला अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.

‘अमेडिया’ कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांनी तेजवानी हिच्याकडून शेतजमीन नावावर असलेल्या व्यक्तींचे कुलमुख्यातरपत्र तयार करून घेतले. कोरेगाव पार्कमधील ४० एकर जमिनीचा व्यवहार ३०० कोटी रुपयांत करण्यात आला. माहिती-तंत्रज्ञान पार्कच्या नावाखाली उद्योग संचालनालयाकडून इरादा पत्र घेण्यात आले. त्यानुसार मुद्रांक शुल्क सवलत देण्याबाबतचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर मुद्रांक शुल्कात २१ कोटी रुपयांची सवलत देण्यात आली. संबंधित जमिनीची जुनी कागदपत्रे, सातबारा उतारे, त्यावर बदलत गेलेल्या नोंदी, तसेच अन्य कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांतधिकारी कार्यालय, मुद्रांक शुल्क कार्यालय, महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळवली.

तेजवानी हिची पुणे पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी सलग सहा तास चौकशी केली. ही जमीन महार वतनाची आहे. परंतु, २००६ मध्ये शीतल तेजवानी हिने २७५ व्यक्तींकडून ही जमीन ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ करून घेतली. नंतर २०२५ ला तेजवानी हिने ‘अमेडिया’ कंपनीबरोबर करार करून ती जमीन त्यांना दिली. या जमीन प्रकरणात जूनमध्ये ताबा घेण्याचादेखील प्रयत्न झाला होता. या प्रकरणात नेमका व्यवहार काय झाला, या अनुषंगाने पुणे पोलिसांनी तपास केला. संबंधित व्यक्तींकडून ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ करून घेताना मोबदला दिला का, कशाच्या आधारावर ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ केली, ‘अमेडिया’ कंपनीबरोबर व्यवहार कशापद्धतीने झाला, या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली. या संदर्भातील कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

कायदेशीर प्रक्रियेत कोणालाही खोडा घालण्यास मुभा नाही - उच्च न्यायालय

यूपीआयची आज दशकपूर्ती; दहा वर्षांत व्यवहारात १३ हजार पटीने वाढ

भारतात साखरेची कमतरता नाही; 'इस्मा'चा ठाम दावा

भारत आणि रशिया व्यापार सहकार्य वाढणार; परराष्ट्र मंत्री जयशंकर-पुतीन भेट

रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल