राहुरीत भाजपचा शरद पवार गटाला धक्का; प्राजक्त तनपुरेंची निवडणुकीतून माघार 
महाराष्ट्र

राहुरीत भाजपचा शरद पवार गटाला धक्का; प्राजक्त तनपुरेंची निवडणुकीतून माघार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राहुरीत भाजपने धक्का दिला. शरद पवार गटाचे उमेदवार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना गळाला लावून भाजपने राहुरीची पोटनिवडणूक एकतर्फी केली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर करावी लागली.

Swapnil S

मुंबई / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राहुरीत भाजपने धक्का दिला. शरद पवार गटाचे उमेदवार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना गळाला लावून भाजपने राहुरीची पोटनिवडणूक एकतर्फी केली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर करावी लागली.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे येत्या २३ एप्रिल रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी राहुरीत नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज सकाळी तनपुरे यांची त्यांचा कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीची पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

सूत्राच्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी प्रकरणात तनपुरे यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरु आहे. तसेच डबघाईला आलेल्या राहुरी सहकारी साखर कारख्यान्याच्या पुनुरुज्जीवनासाठी तनपुरेंना राज्य सरकारची मदत हवी आहे.  आजच्या भेटीत चव्हाण आणि विखे-पाटील यांनी मोबाईलवरून तनपुरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे करून दिले. मुख्यमंत्र्यांच्या साखर कारखान्याच्या प्रकरणात मदत करण्याचा शब्द दिल्यानंतर तनपुरे  यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाने शरद पवार गटाची मोठी अडचण झाली. शेवटी पवार गटाला गोविंद मोकाटे यांना उमेदवारी द्यावी लागली. मोकाटे हे राहुरी पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत. तनपुरेंच्या निर्णयाने भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा  मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीत एकूण ३० उमेदवारांनी अर्ज  दाखल केले आहेत.

भाजपच्या नेत्यांनी आजच्या भेटीत पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली. तालुक्यातील प्रश्नांसाठी निवडणूक लढवावी हा माझा उद्देश होता. राहुरीतील रस्त्यांची समस्या, एमआयडीसीचा प्रश्न  मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे
प्राजक्त तनपुरे

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video