रायगड : श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी एक भला मोठा बोया लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. अचानक दिसलेल्या या वस्तूमुळे सुरुवातीला भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तपासाअंती हा बोया बाणकोट खाडीतून भरकटून आलेला असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. जीवना बंदर परिसरात चारचाकी वाहनांचे टायर लावलेला हा बोया किनाऱ्यावर लागला होता. या घटनेची माहिती मेरीटाईम बोर्डाचे कर्मचारी नीतेश तांबे यांनी श्रीवर्धन पोलिसांना दिली. माहिती मिळताच श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि मेरीटाईम बोर्डाचा पथक घटनास्थळी दाखल झाले व बोयाचा उगम शोधण्यास सुरुवात केली.
अफवांवर विश्वास ठेवू नका
या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेली घबराट लक्षात घेता, श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांनी स्पष्ट केले की, हा केवळ बांधकामासाठी वापरला जाणारा बोया असून कोणताही धोका नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
स्थानिक मच्छीमारांचे स्पष्टीकरण
स्थानिक मच्छीमारांनी सांगितले की, बोया म्हणजे समुद्रातील बोटींना सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा बुडालेल्या जहाजाला वर खेचण्यासाठी वापरला जाणारा मोठा तरंगता फुगवटा असतो. बुडालेला बार्ज हा मुंबईतील अब्दुल रजाक अन्सारी यांच्या मालकीचा असल्याचे समजते. त्यांनी २० ऑक्टोबर रोजी पुलाच्या पिलरच्या कामासाठी हा बोया भाड्याने घेतला होता. प्रतिकूल हवामानामुळे तो तुटून समुद्रात वाहून गेला.
पुलाच्या कामाशी संबंधित बोया
तपासानुसार, बाणकोट खाडीत बागमांडला-बाणकोट दरम्यान सुरू असलेल्या खाडी पुलाच्या पिलर बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या बार्जच्या कामात हा बोया वापरण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट सागरी पोलीस ठाणे हद्दीत एक बार्ज बुडाला होता. तो समुद्रातून वर खेचण्यासाठी ओहोटीच्या वेळी हा बोया बांधण्यात आला होता. भरतीच्या वेळेस त्याचा उपयोग बार्ज उचलण्यासाठी होणार होता. मात्र, हवामान अचानक खराब झाल्याने बोयाचा दोर तुटला आणि तो समुद्राच्या प्रवाहात वाहत गेला. अखेरीस हा बोया आज सकाळी श्रीवर्धन किनाऱ्यावर येऊन लागला.