Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर 
महाराष्ट्र

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

राजापूरच्या हातिवले येथे गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या फोर्स अर्बेनिया वाहनाला भीषण अपघात झाला असून, ८ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत.

Mayuri Gawade

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला रविवारी (दि. १३) राजापूरमध्ये भीषण अपघात झाला. राजापूर तालुक्यातील हातिवले येथील अंकिता पॅलेससमोर फोर्स अर्बेनिया वाहनाचा अपघात झाला. या वाहनातून सुमारे १५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ८ ते १० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं.

अंकिता पॅलेससमोर वाहन भिंतीवर आदळलं

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी निघालेले हे प्रवासी राजापूरच्या हातिवले परिसरातून जात होते. यावेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फोर्स अर्बेनिया रस्त्यालगतच्या भिंतीवर आदळल्याचं सांगितलं जात आहे. धडक इतकी जोरदार होती की वाहनाच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं.

या वाहनातून प्रवास करणारे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं

अपघाताची माहिती मिळताच हातिवले परिसरातील स्थानिक तरुण घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, राजापूर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार चालकाचं नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात असलं, तरी अधिकृत निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

गणपतीसाठी कोकणाकडे चाकरमान्यांची मोठी गर्दी

दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून लाखो चाकरमानी कोकणाच्या दिशेने रवाना होतात. यंदाही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाविक गावी निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून, इंदापूर आणि माणगाव परिसरात १० किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत आहेत. दुसरीकडे, कोकणाकडे जाणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब होत आहे. अशा परिस्थितीत राजापूरमधील या अपघातामुळे गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

माथेरानला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस; महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

Mumbai : नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले, Video

Ulhasnagar : बाप्पा येणार... पण खड्ड्यांतूनच? महापौरांचा संकल्प गेला खड्ड्यात! अजूनही विघ्न कायम; नागरिकांचा संतप्त सवाल

Pune : पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; वाजत-गाजत निघणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आगमन मिरवणूक