सचिन अहिर शिंदे सेनेत; ठाकरे गटाला आणखी एक हादरा; थेट 'परिषदे'च्या उपसभापतीपदाची उमेदवारी X
महाराष्ट्र

सचिन अहिर शिंदे सेनेत; ठाकरे गटाला आणखी एक हादरा; थेट 'परिषदे'च्या उपसभापतीपदाची उमेदवारी

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जाणारे सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देऊन शिंदे यांनी ठाकरे गटाला नव्याने शह दिला.

Swapnil S

मुंबई : लोकसभा खासदार फुटीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा नवा धक्का दिला. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जाणारे सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देऊन शिंदे यांनी ठाकरे गटाला नव्याने शह दिला. फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील दौरा आटोपून मुंबईत परतलेल्या उद्धव ठाकरे यांना यामुळे झटका बसला असून ठाकरे गटाची विधान परिषदेतली ताकद घटली आहे.

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी बुधवारी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीने नाट्यमयरीत्या सचिन अहिर यांनी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सचिन अहिर हे एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पक्ष कार्यालय असलेल्या 'बाळासाहेब भवन' येथे दाखल झाले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी,  सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर विधान परिषदेत  निवडून आले आहेत. त्यांना  शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी त्यांना मतदान केले आहे. त्यामुळे अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत, असे सांगितले.  विधान परिषदेत महायुतीकडे बहुमत असल्याने  उपसभापतिपदी अहिर यांचीच निवड होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

अहिर यांना पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. ते उपनेते होते, त्यांना विधान परिषदेवर संधी दिली, कामगार सेनेतील पद दिले, बेस्ट युनियनचे अध्यक्षपद दिले आणि त्यांच्या मुलीच्या एनजीओला वॉर्ड स्तरावरील समितीत जागा दिली. आम्ही त्यांना काय दिले नाही?" असा सवालही त्यांनी केला.

पक्षांतरबंदी कायद्याचा अडथळा नाही

सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेना  शिंदे गटासोबत  जाण्याचा  निर्णय घेतला असला तरी त्यांना पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा कोणताही अडथळा नाही. कारण विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती यांना पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी लागू नाहीत, असे विधिमंडळ सचिवालयाच्या सूत्रांनी सांगितले. पीठासीन अधिकारी हे पद कोणत्याही पक्षाचे नसते. जर पीठासीन अधिकारी पदावर निवडून आल्यानंतर त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला आणि त्यांच्यावर घटनेच्या अनुसूची १० अंतर्गत कारवाई करण्यासाठी कुणी अर्ज केला तर त्यावर पुढे कार्यवाही होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा हिरमोड

विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची माळ सचिन अहिर यांच्या गळ्यात पडल्याने या पदाच्या दावेदार  डॉ. नीलम गोऱ्हे यांचा हिरमोड झाला आहे. पुन्हा संधी मिळेल, अशी डॉ. गोऱ्हे यांना खात्री होती. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाने त्यांचे स्वप्न भंगले.

ठाकरे गटाकडून अभ्यंकर यांना उमेदवारी

दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापतिदाच्या निवडणुकीत  शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधी ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे अभ्यंकर यांना अहिर यांच्यासमोर निभाव लागणे कठीण आहे.

शेवटपर्यंत बातमी गुप्त

शिंदे गटाकडून अहिर यांच्या उमेदवारीविषयी प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती. उपसभापतीपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात दाखल होईपर्यंत ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना शिंदेंच्या खेळीची कोणतीही कल्पना नव्हती. सचिन अहिर शिंदेंच्या गोटात दाखल झाल्याची बातमी ही ठाकरे गटाच्या बहुतांश आमदारांना प्रसारमाध्यमांकडून समजली.

वरळीवर परिणाम नाही- आदित्य

सचिन अहिर यांच्या निर्णयाचा वरळी आणि शिवडी यांसारख्या पक्षाच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. "हे ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र असून आमच्या पक्षाचे यात 'कोलेटरल डॅमेज' झाले आहे," असेही ते म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट; दोन दिवस मुंबईत मुसळधार; रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट 

Mumbai : विद्यार्थ्याचा करुण अंत; चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळले

Mumbai : मोडकसागर धरणाला गळती; पूर नियंत्रण दरवाजांचे दोन्ही रबर सील नादुरुस्त; दुरुस्तीसाठी पालिका करणार ९८ लाख रुपये खर्च

मुंबईने नाना शंकरशेठ यांना कधीच विसरू नये

जुलै महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य