पुणे : दया याचिकेच्या माध्यमातून शिक्षा कमी करण्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे १० दयाअर्ज केले होते, असे सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात मान्य केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल मानहानीच्या खटल्यातील फिर्यादी असलेले सात्यकी यांनी, या माफीपत्रांतील भाषा ही केवळ औपचारिक होती किंवा ती सावरकरांच्या राजकीय रणनितीचा भाग होती, हे सिद्ध करणारा कोणताही तज्ज्ञ अहवाल उपलब्ध नसल्याचेही मान्य केले.
पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल मानहानीच्या खटल्यात सोमवारी फिर्यादी सात्यकी सावरकर यांची राहुल गांधी यांच्यावतीने ॲड. मिलिंद पवार यांनी उलटतपासणी घेतली.
दयेच्या अर्जाची भाषा नम्रतेची होती...
या उलटतपासादरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी मान्य केले की, त्यांची आई हिमानी सावरकर यांनी पुणे येथील कसबा व कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळा त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. तसेच, विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे दहा वेळा दयेचा अर्ज केला होता, हे त्यांनी मान्य केले. सावरकर यांच्या दयेच्या अर्जाची भाषा नम्रतेची होती, हेही त्यांनी स्वीकारले. दयाअर्जातील भाषा ब्रिटिश सरकारप्रति निष्ठा व्यक्त करणारी होती, हे त्यांनी मान्य केले नाही; मात्र ती भाषा तत्कालीन शासकीय व कार्यालयीन कामकाजाच्या पद्धतीनुसार होती, असे त्यांनी सांगितले.
दयेच्या अर्जाच्या माध्यमातून शिक्षा कमी करण्यासाठी विनायक सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे विनंती केली होती, हेही सात्यकी सावरकर यांनी मान्य केले. सावरकर यांचा कैदी क्रमांक ३२७७८ होता, असेही त्यांनी सांगितले.याशिवाय, शिक्षा झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात विनायक सावरकर यांनी दया अर्ज दाखल केल्याचेही सात्यकी यांनी मान्य केले.
पुढील सुनावणी १ जुलै रोजी न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे पुढील सुनावणी दिनांक १ जुलै २०२६ रोजी होणार आहे. या खटल्यात ॲड. ज्ञानेश्वरी जाधव, ॲड. सुयोग गायकवाड, ॲड. आकाश देशमुख, ॲड. सारंग बहिरट व ॲड. कैलास जिरे हे सहकार्य करीत आहेत.
दयाअर्ज करणे हे क्रांतिकारकांवर बंधनकारक नव्हते
विनायक दामोदर सावरकर यांनी दि. १४ नोव्हेंबर १९१३ रोजी दोन पानांचा दयाअर्ज सादर केला होता आणि त्याचा संपूर्ण मजकूर सरकार दप्तरी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक दया अर्जात ‘आय बेग टु रिमेन, सर, युवर मोस्ट ओबेंडियंट सर्व्हंट, व्ही. डी. सावरकर’ असा मजकूर लिहून सावरकरांनी त्यावर सही केली असल्याचे मला माहीत नसल्याचे सांगितले. तसेच, दया अर्ज करणे हे क्रांतिकारकांवर बंधनकारक नव्हते; ते संबंधित कैद्याच्या इच्छेवर व निर्णयावर अवलंबून होते, असेही त्यांनी नमूद केले.