सावंतवाडी शहरात सुरू होणार आयुष बाह्यरुग्ण विभाग; १ ऑक्टोबरपासून नागरिकांना मोफत तपासणी, उपचार आणि औषधांची सुविधा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

सावंतवाडी शहरात सुरू होणार आयुष बाह्यरुग्ण विभाग; १ ऑक्टोबरपासून नागरिकांना मोफत तपासणी, उपचार आणि औषधांची सुविधा

महाराष्ट्रातील पहिला आयुष बाह्यरुग्ण विभाग सावंतवाडी शहरात येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सावंतवाडी नगरपरिषद, केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ-गोवा यांच्यात यासंदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

Swapnil S

सावंतवाडी : महाराष्ट्रातील पहिला आयुष बाह्यरुग्ण विभाग सावंतवाडी शहरात येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सावंतवाडी नगरपरिषद, केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ-गोवा यांच्यात यासंदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या आयुष बाह्यरुग्ण विभागात नागरिकांना मोफत तपासणी, उपचार आणि औषधे आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमामुळे सावंतवाडी शहराची 'आयुर्वेदिक भूमी' म्हणून असलेली ओळख अधिक दृढ होण्यासोबतच आयुर्वेदिक पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी नगरपरिषदेच्या वतीने, तर संस्थेच्या वतीने अधिष्ठाता डॉ. सुजाता कदम यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, सावंतवाडी शहरात सुरू होणारा हा बाह्यरुग्ण विभाग महाराष्ट्रातील पहिलाच आहे. हा विभाग सुरू करण्यासाठी राज्याचे आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचे योगदान महत्त्वाचे आहे. नगरसेवक दिव्या सूर्याजी यांनीही सावंतवाडी शहरात असा विभाग सुरू व्हावा, यासाठी आग्रही भूमिका घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच हा विभाग सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी शहरात आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, नगरपरिषदेचे आरोग्यधाम आणि पंचकर्म केंद्र यापूर्वीपासूनच कार्यरत आहेत. नगरपरिषदेने या विभागासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही केसरकर यांनी केले. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये आयुष मंत्रालयाला ५० एकर जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी आरोग्य उद्यान, योग केंद्र यांसारख्या सुविधा विकसित करण्याबाबत विचार व्हावा. हे उपक्रम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही केसरकर यांनी केले.

नगराध्यक्षा श्रद्धा भोसले म्हणाल्या की, आयुष बाह्यरुग्ण विभागामुळे शहरातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. आरोग्य विभागाच्या जागेतच हा विभाग सुरू करण्यात येणार असून, येत्या १ ऑक्टोबरपासून या सेवेचा शुभारंभ होईल.

सावंतवाडी शहरात आयुष बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना उपचारासाठी गोव्यात जाण्याची गरज कमी होणार आहे. पुढील टप्प्यात धारगळ येथून तज्ज्ञ डॉक्टर सावंतवाडीत येऊन रुग्णांची तपासणी करतील. तसेच गरजेनुसार पंचकर्म आणि शस्त्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
दीपक केसरकर, आमदार
धारगळ येथील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. आता सावंतवाडीत आयुष बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्याने ही सेवा त्यांना सावंतवाडीतच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
डॉ. प्रदीप कुमार प्रजापती, संचालक आयुष मंत्रालय

तृतीयपंथीयांना घर नाकारले तर कारवाई; राज्य सरकारचा इशारा

Mumbai : दोन हजार कोटी खर्चुन हॉटेल, पार्किंग हब, शॉपिंग मॉल; मानखुर्द जकात नाक्यावर ३० मजली इमारत

Mumbai : लालबागमधून इंदूरच्या चोरट्यांना अटक; सोन्याची साखळी, रोख रक्कम, मोबाईलची केली चोरी

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

निर्भेळ यशासाठी भारतीय संघ सज्ज; अफगाणिस्तानविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना; वैभवला संधी मिळण्याची शक्यता