मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे.
कोकण रेल्वे हा देशातील सर्वात आव्हानात्मक रेल्वे प्रकल्प मानला जातो. पश्चिम घाटातील डोंगररांगा, खोल दऱ्या, नद्या आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे कागदावर राहिला होता. मात्र, तत्कालीन रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेची गरज केंद्र सरकारसमोर ठामपणे मांडली आणि या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
कोकण रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात यावा, यासाठी दंडवते यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कोकण रेल्वे सुरू झाली, अशी कोकणवासीयांची भावना आहे. त्यामुळे त्यांचे नाव कोकण रेल्वेमार्गावरील महत्त्वाच्या अशा सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्यात यावे, अशी मागणी गेली काही वर्षे केली जात आहे.
या लोकभावनेची दखल घेऊन सावंतवाडी रेल्वे स्थानकास ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नाव देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या नामकरणाबाबत केंद्र सरकारच्या गृह आणि रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली आहे.