मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू असतात. परंतु, अशा कोणत्याही चर्चेला काही अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात भक्कमपणे काम करत असून ज्याला कोणाला यायचं आहे, त्यांनी आमच्यात यावे. आम्ही कुणाच्या सहभागी होणार नाही, अशा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी सोमवारी अजित पवार गटाला दिला.
यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची शक्यता निकाली निघाल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली. बैठकीत दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पवार यांनी पक्ष अजित पवार गट किंवा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.