मुंबईः राज्यातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून त्यांच्या शेतातील उभी पिके पावसाअभावी करपली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.
राज्यभरातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांना तातडीने दुष्काळसदृश घोषित करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात. याशिवाय शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार तर शेतमजूर कुटुंबाला प्रत्येकी २५ हजार रुपयांची विशेष मदत देण्याची मागणी पवार यांनी केली आहे.कर्जमाफी योजनेची तातडीने अंमलबजावणी करून तात्काळ पीककर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांवरून १ लाख रुपये करण्यात यावे. तसेच सन २०२५-२६ मध्ये पीककर्ज घेऊन यंदा थकीत झालेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात यावा, अशी सूचना पवार यांनी सरकारला केली आहे.
शरद पवारांच्या सरकारला सूचना
एक रुपयात पीकविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण द्यावे
गेल्यावर्षी अवकाळी पावसाच्या नुकसानीसाठी जाहीर करण्यात आलेली हेक्टरी १७ हजार रुपयांची पीकविमा मदत तत्काळ द्यावी
दुष्काळसदृश तालुक्यांमध्ये रोहयोच्या माध्यमातून शेती, जलसंधारण संबंधित कामे करून घ्यावीत. फळबागांसाठी टँकर व्यवस्था सुरू करावी
पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांचे तात्काळ सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार शासकीय टँकर सुरू करावेत
दुष्काळात वीज भारनियमनाची समस्या वाढत असल्याने विद्युत रोहित्र दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी
प्रत्येक जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि पशुधनाची स्थिती यावर देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करावेत
दुष्काळसदृश तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे केवळ परीक्षा शुल्क माफ न करता संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.