सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरअखेर पावसाने मोठी ओढ दिल्याने पिण्याचे पाणी, खरीप पिके, जनावरांसाठी चारा-पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम जाणवत आहे. उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सुमारे ४८१ मिमी असताना जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत आतापर्यंत केवळ १९७.९ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. म्हणजेच पावसाची तूट सुमारे ५३.५७ टक्के आहे. एकूणच सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी पुरता बरबाद झाला असून शेतीचे मोठे संकट ओढवल्याने बळीराजा हतबल झाला आहे. उभी पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. सरकारच्या मदतीपेक्षा निसर्गाने साथ दिली तरच खऱ्या अर्थाने शेतकरी जगणार असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत.
पावसाअभावी भूजल पातळी वाढण्यास अपेक्षित मदत झालेली नाही. सप्टेंबरच्या मध्यावधीतील जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार १०८ गावे आणि ५५१ वाड्या-वस्त्यांतील सुमारे दोन लाखांहून अधिक नागरिकांना ९८ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागत होते. बाधित गावांमध्ये बार्शी १३, सांगोला २०, करमाळा ११, माढा १४, मंगळवेढा २३, माळशिरस ८, अक्कलकोट ११ आणि उत्तर सोलापूर ५, दक्षिण सोलापूर ३ या गावांचा समावेश होता.
खरीप पिकांवर मोठा परिणाम
एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामातील सुमारे ८० ते ८५ टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. पुढील पंधरा दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.सोलापूर जिल्ह्यासह उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.उजनीत पाणी, मात्र स्थानिक पातळीवर अडचण आहेत.विशेष म्हणजे ९ सप्टेंबर २०२६ रोजी उजनी धरणात ११७.१७ टीएमसी म्हणजे ९९.८१ टक्के पाणीसाठा असल्याची नोंद होती. मात्र धरणातील पाणी उपलब्ध असूनही जिल्ह्यातील सर्व भागांतील भूजलपातळी आणि स्थानिक जलस्रोतांची स्थिती समान नसल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायम आहे.
३ लाख ५६ हजार हेक्टरवर खरीप पेरणी
यंदा सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ३७ हजार ९६८ हेक्टर असून प्रत्यक्षात सुमारे ३ लाख ५६ हजार ९१८ हेक्टरवर म्हणजे १०५ टक्के पेरणी झाली. मात्र पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने मोठ्या क्षेत्रावरील पिकांवर संकट आले आहे. एका प्रशासकीय पाहणीच्या अहवालानुसार ४ लाख २ हजार ५२३ हेक्टरवरील पिके पावसाअभावी करपण्याच्या स्थितीत असल्याचे नमूद करण्यात आले होते. सोयाबीन, तूर, उडीद, मका आणि ऊस यासह विविध पिकांना पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे. काही भागांत सोयाबीनची वाढ खुंटली असून, ऊसाची वाढ मंदावली आहे. लिंबूवर्गीय बागांनाही पावसाच्या तुटीचा परिणाम जाणवत आहे
२७ लाख पशुधन - प्रकार - संख्या
गायी - गोवंश ७,४५,४०४
म्हशी ४,९६,४५४
मेंढ्या ४,९६,४५४
शेळ्या ९,६२,५०४
सरकारच्या उपाययोजना तकलादू
येणारा काळ आमच्यासाठी अत्यंत भीषण व भीतीदायक आहे. खरिपात सोयाबीन पेरले मात्र त्याला फलधारणा झाली नाही. दोन दिवसाच्या रिमझिम पावसामुळे ते हिरवे झाले. मात्र शेंगाच लागल्या नाहीत. हातातून खरीप गेले आहे, रब्बीची पेरणी होण्याची शक्यता नाही. रब्बीची पेरणी नाही झाल्यास जनावरांना काय घालावे, त्यांना कसे जगवावे हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. निसर्गाने झोडपले आणि राजाने मारले तर सांगावे कोणाला ? अशी अवस्था झाली आहे. सरकार तकलादू उपाय योजना करत आहे.दामोदर नीळ, शेतकरी, कोंडी. उत्तर सोलापूर
हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेची समस्या
पावसाचा खंड वाढल्याने ग्रामीण भागात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच हिरव्या चाऱ्याची उपलब्धताही महत्त्वाची समस्या बनली आहे. जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता तपासण्यात आली. राज्याच्या २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांमध्ये पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. सोलापूरच्या ९५ महसूल मंडलांपैकी ५३ मंडलांमध्ये २० सप्टेंबरपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.