राज्यातील क्रीडा संकुले आणि स्टेडियम भटक्या कुत्र्यांपासून मुक्त ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरही भटक्या कुत्रे व अन्य प्राण्यांना आवरावे, असे आदेश दिले आहेत.
महामार्गाची देखभाल करणाऱ्या सर्व सार्वजनिक बांधकाम कार्यालयांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवावी, असे सरकारने स्पष्ट केले आहे. ही मोहीम सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने असेल.
भटकी कुत्री व इतर प्राण्यांचा वावर असणारी धोकादायक व संवेदनशील ठिकाणे ओळखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत भटके प्राणी पकडून त्यांना निवारा केंद्रांमध्ये हलवण्यात येणार आहे. तसेच, भटकी कुत्री व इतर प्राण्यांची ठिकाणे तपासण्यासाठी नियमित पाहणी करणाऱ्या सतर्क पथकांची नियुक्ती केली जाईल. या विशेष पथकांमध्ये स्थानिक पोलीस, पशुसंवर्धन विभाग तसेच महापालिका किंवा पंचायत कार्यालयांचे प्रतिनिधी असतील.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची हेल्पलाईन क्रमांक १०३३ आणि राज्य आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक ११२ यांच्या माध्यमातून जनजागृती व प्रसिद्धी मोहीमही राबवण्यात येणार आहे. हे क्रमांक महामार्गांवर ठराविक अंतरावर ठळक अक्षरांत दर्शवले जातील. तक्रारींचे तत्काळ निवारण व सतर्कता सुनिश्चित करण्यासाठी हे हेल्पलाईन क्रमांक स्थानिक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आणि जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षांशी जोडले जातील, असे आदेशात नमूद आहे.