बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह अरुण लखानी आणि वंदना लखानी यांचा सुपुत्र सारंग यांच्याशी सारंग लखानी यांच्याशी ठरला आहे. ही आनंदाची बातमी सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर जाहीर केली आहे.
सांगायला अतिशय आनंद होतोय की... सुप्रिया सुळेंची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत
सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर रेवती आणि सारंग यांचे फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. "सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमची मुलगी रेवती हिचा विवाह अरुण लखानी आणि वंदना लखानी यांचे सुपुत्र सारंग यांच्याशी निश्चित झाला आहे," असे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अवघ्या काही शब्दांत त्यांनी होणाऱ्या जावयाची ओळख या पोस्टमध्ये करून दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी सारंगचे तीन फोटो शेअर केले आहेत. त्यातील दोन फोटो हे रेवतीसोबत असून टेनिस कोर्टवरील तिसरा फोटो सासरे सदानंद सुळे यांच्यासोबत आहे.
कोण आहेत सारंग लखानी?
सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग लखानी हे मूळचे नागपूरचे रहिवासी असून ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. सारंग लखानी हे उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी २०१४ मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.कॉम., आयआयएम बंगळुरू येथून मॅनेजमेंट स्टडीज आणि मे २०२३ मध्ये कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले आहे. सुळे आणि लखानी कुटुंबीयांचे हे नाते जुळवून आणण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी असल्याची चर्चा आहे.
रेवती सुळेंचं शिक्षण
रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) येथून पदवी शिक्षण पूर्ण केले असून, सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स (बी.ए.) ही पदवी मिळवली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान रेवती सुळे पहिल्यांदाच आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या.
स्मृती शिंदेंकडून पहिला फोटो शेअर
याआधी, मंगळवारी (दि. १०) माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी रेवती आणि सारंग यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्या पोस्टमध्ये त्यांनी सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि विजय सुळे यांना टॅग केले होते. त्यानंतर विजय सुळे यांनीही बहिणीच्या लग्नाबद्दल पोस्ट केली. त्यामुळे या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती.
पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहाच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, रेवती आणि सारंग यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.