शरद पवार, अमित शहा (डावीकडून) 
महाराष्ट्र

आतापर्यंत कुठलाही गृहमंत्री तडीपार नव्हता! शरद पवारांचा अमित शहा यांना टोला

केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी अनेकांनी पार पाडली आणि पदाची गरिमा जपली. मात्र, तडीपार माणूस गृहमंत्री असल्याने काय अपेक्षा करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत.

Swapnil S

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी अनेकांनी पार पाडली आणि पदाची गरिमा जपली. मात्र, तडीपार माणूस गृहमंत्री असल्याने काय अपेक्षा करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत. देशाच्या इतिहासात अनेक गृहमंत्री झाले, पण आतापर्यंत कुणालाही तडीपार करण्यात आलेले नव्हते, अशी सणसणीत चपराक लगावत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहा यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले.

शिर्डीत भाजपच्या महाअधिवेशनात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शहा यांच्या टीकेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. “देशाच्या गृहमंत्रीपदी एकेकाळी सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण होते. या सर्वांनी पदाची प्रतिष्ठा वाढवण्याचे अतिशय मोलाचे काम केले. गुजरातनेही देशाला उत्तम प्रशासक दिले. पण यापैकी कोणालाही कधी त्यांच्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हते. तो प्रसंग कधी या राज्यकर्त्यांवर आला नाही. आजच्या गृहमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मला ती आठवण होतेय,” अशा शब्दांत शरद पवार यांनी शहा यांना शालजोडीतला टोला हाणला.

“१९७८मध्ये मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. तेव्हा अमित शहा राजकारणात होते का नाही, हे माहीत नाही. पण त्यावेळी जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी आदी कर्तृत्ववान लोक, माझ्या मंत्रिमंडळात होते. जनसंघाची पार्श्वभूमी असणाऱ्या अनेकांनी माझ्यासोबत काम केले आहे. नंतरच्या काळात देशात वेगवेगळे पक्ष सत्तेत होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या नेत्यांसोबत सुसंवाद होता. या नेत्यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. आता नेत्यांमधील संवाद हरवला आहे. ४० वर्षांपूर्वीची टीका करणारे आताचे गृहमंत्री तेव्हा कुठे होते मला माहीत नाही,” अशा शब्दांतही शरद पवारांनी शहांना सुनावले.

“देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही कर्तृत्ववान व्यक्ती देशाला गृहमंत्री म्हणून लाभल्या. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर अत्यंत प्रभावी आणि सर्व राज्यांना एकत्रित करण्याचे काम केले. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशचे पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी देशाचे गृहमंत्रीपद सांभाळले. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या सर्वांनी पदाची गरिमा आणि प्रतिष्ठा वाढवली. आताच्या गृहमंत्र्यांनी भाषणात मी आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली, त्यावर न बोललेलेच बरे. मराठीत एक म्हण आहे, ‘कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी’. भूजला भूकंप झाला, त्यावेळी पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. त्यावेळी येणारी संकटे आणि अतिवृष्टी, महापूर, भूकंपाचे धक्के यावर धोरण ठरवण्यासाठी वाजपेयी यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केले,” अशी आठवणही शरद पवारांनी सांगितली.

देशमुख हत्याप्रकरणी फडणवीसांनी निर्णय घ्यावा

“मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माझ्या भूमिकेपेक्षा राज्याच्या प्रमुखांनी याचा निर्णय घेतला पाहिजे. संबंध महाराष्ट्रात सुरू असलेल्या चर्चेची नोंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पाहिजे. या प्रकरणाची अधिक माहिती गृह खात्याकडे असू शकते. त्यामुळे वस्तुस्थिती पाहून वातावरण दुरुस्त करण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा तातडीने केली पाहिजे,” असे शरद पवार म्हणाले.

...त्यावेळी बाळासाहेबांनी अमित शहांना आसरा दिला!

अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका केली, ती राज्यातील जनतेने पाहिली. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे बोलतीलच. जेव्हा हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, त्यावेळी त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील. आता यांची पातळी किती घसरली, हे सांगायला मी दिलेली उदाहरणे पुरेशी आहेत, असा टोला त्यांनी अमित शहा यांना लगावला.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या