जव्हार : यूपीआय व्यवहारांवर १५ ऑक्टोबरपासून ०.४ टक्के एमडीआर शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चेमुळे व्यापारी आणि ग्राहकांकडून रोख व्यवहारांना पुन्हा प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जव्हार शहरातील एटीएम केंद्रांवर व्यवहारांचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता असून, शहरातील सातही एटीएम केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढू शकते.
जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायती आणि दोन ग्रामदान मंडळे आहेत. तालुक्यातील बहुतांश प्रशासकीय कार्यालये जव्हार शहरात असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी शहरात यावे लागते. अशा वेळी रोख रक्कम काढण्यासाठी त्यांना शहरातील एटीएमवर अवलंबून राहावे लागते. यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागू झाल्यास अनेक नागरिकांकडून रोख रकमेचा वापर वाढण्याची शक्यता आहे.
विशेषतः दुर्गम आदिवासी भागातून नागरिक विविध कामांसाठी जव्हार शहरात येतात. अशा वेळी एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध नसल्यास किंवा तांत्रिक कारणांमुळे एटीएम सेवा बंद असल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी एटीएम सेवा विस्कळीत झाल्यास नागरिकांची गैरसोय आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढल्याने रोख रकमेवरील नागरिकांचे अवलंबित्व कमी झाले होते. मात्र, यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणीच्या चर्चेमुळे रोख व्यवहार पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे बँकांनी जव्हार शहरातील सर्व एटीएममध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध ठेवावी, तसेच शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही एटीएम सेवा सुरळीत ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागू झाल्यास अनेक नागरिकांकडून रोख रकमेचा वापर वाढण्याची शक्यता आहे.
यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागू झाल्यास रोख पैशांची गरज वाढू शकते. त्यामुळे जव्हार शहरातील एटीएमवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. बँकांनी एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध ठेवावी आणि शनिवार-रविवारीही सेवा सुरळीत ठेवावी.अश्विनी वांगड, नागरिक