मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी विधानसभेत सीमाप्रश्नासंदर्भातील बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक त्यांनी घेतली. विशेष म्हणजे, शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांनी ही बैठक घेतली.
तत्पूर्वी, एकनाथ शिंदेंनी आपल्या दालनात शरद पवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र, या भेटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेतल्या तर मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते’, असे राऊत यांनी म्हटले आहे. नंतर एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
‘ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशाप्रकारच्या बैठका घेतल्या तर मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते. आम्ही त्यांच्या जागी असतो तर आम्ही अजितदादांच्या दालनात जाऊन बैठक घेतली नसती. शरद पवार यांनी काय करावे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेंच्या दालनात तुम्ही येता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, ही कृती शिवसेनेला दुखावणारी आहे’, असे राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर आगपाखड केली. ते म्हणाले की, तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देत आहात. आम्हाला मनाला ही गोष्ट लागलेली आहे. गद्दारी ही गद्दारी असल्याचे ते म्हणाले. आम्ही तुमच्या पक्षातील गद्दारांना कधीच प्रतिष्ठा देणार नाही. आम्ही त्यांच्या दालनात त्यांच्या छताखाली जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेणार नाही’, असेही राऊत म्हणाले.
ती भेट राजकीय नव्हती : शशिकांत शिंदे
सातारा : ‘ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट हा केवळ एक योगायोग होता. त्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता’,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. विधानभवनात सीमावादाच्या संदर्भात एक महत्त्वाची समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. शरद पवार हे देखील या बैठकीला हजर होते. बैठक संपल्यानंतर पवार साहेब तिथून निघाले असता काही वेळासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये थांबले असता प्रोटोकॉलनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला. तिथे इतरही आमदार-खासदार उपस्थित होते. त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढणे पूर्णपणे चुकीचे आहे’, असे शशिकांत शिंदे म्हणाले.
राजकीय संस्कृती जपतोय : शिंदे
’शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते आहेत, ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती आहे, ती आम्ही जपतोय. आता, यामुळे ज्यांच्या कुणाच्या पोटात दुखत असेल… मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल… त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक ‘आपला दवाखाना’ सुरू केले आहेत, तेथे त्यांनी जावे आणि उपचार करून घ्यावे,’ असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला. तसेच, हा एकप्रकारे कद्दूपणा झाला आहे, अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असेही शिंदेंनी म्हटले आहे.