जिप, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान; ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

जिप, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान; ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि.७) मतदान होत आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१, तर पंचायत समितीच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७ हजार ४३८ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असून जवळपास २ कोटींहून अधिक मतदार या उमेदवारांच्याभवितव्याचा फैसला करतील. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी हाती घेऊन निकाल घोषित केला जाईल.

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर अशा १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नेहमी एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी (गट) मतदान यंत्रावर म्हणजे बॅलेट युनिटवर पांढऱ्या रंगाची तर पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका देण्यात आली आहे.

निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदांच्या आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या एकूण मतदारांमध्ये १ कोटी ६ लाख ३३ हजार २६९ पुरुष, १ कोटी १ लाख ८६ हजार ९६५ महिला तर ४६८ इतर मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी एकूण २५ हजार ४७१ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी सुमारे १ लाख २८ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यात १२५ निवडणूक निर्णय अधिकारी आणि १२५ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

'जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपले गाव आणि परिसराचे भवितव्य ठरविणाऱ्या असतात. म्हणूनच या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून आपणही आपला गाव आणि परिसराच्या उन्नतीत मोलाचे योगदान देऊ शकतो. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करून आपण मतदानाचा आपला बहुमोल हक्क बजावावा.'
दिनेश वाघमारे (आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त)

असा होणार मतसंग्राम

  • जिल्हा परिषदेसाठी २ हजार ६२४ उमेदवार रिंगणात

  • पंचायत समितीसाठी ४ हजार ८१४ उमेदवार उभे

  • २५ हजार ४७१ मतदान केंद्रावर होणार मतदान

  • ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू

  • निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार

Valentine Week 2026 : ७ ते १४ फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचा 'फुल ऑन' आठवडा! रोज डेपासून व्हॅलेंटाईन डेपर्यंत, वाचा यादी

आजचे राशिभविष्य, ७ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

दुखापतीमुळे हर्षित राणा T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर? कॅप्टन सूर्याने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला- "अद्याप त्याला वगळलेले नाही, पण...

Mumbai : लोकलमधील धक्कादायक प्रकार; दादर-मुलुंडदरम्यान लेडिज डब्यातील महिलेसमोर अश्लील चाळे; CCTV द्वारे आरोपीचा शोध सुरू

Mumbai : पाना-फुलांनी सजवले टाळ-मृदुंग, सतार अन् सनई-चौघडा; राणी बागेत आजपासून मुंबई पुष्पोत्सवाचा बहर, पाहा Photo's