मुंबई

मुंबईत ९५ हजार भटके कुत्रे; पुढील महिनाभरात ७० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट

भटक्या श्वानांच्या लसीकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई रेबीजमुक्त करण्यासाठी भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईत ९५ हजार भटके कुत्रे असून, सप्टेंबर २०२३ पासून रेबीजमुक्त मुंबई अभियान राबवण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यांत २५ टक्के भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले असून ७० टक्के लसीकरण मोहीम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने 'मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प' अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी निरंतर अभियान हाती घेण्यात आले आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत.

भटक्या श्वानांच्या लसीकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. विशेषतः रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे, रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे व त्याद्वारे भटक्या श्वानांच्या चाव्यामार्फत होणाऱ्या रेबीजच्या मानवी संक्रमणाचा धोका कमी करणे, प्राणी कल्याण संरक्षण करणे, रेबीजचा प्रसार कमी करण्याचे उद्दिष्टे असल्याचे देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.

‘मुंबई रेबीज निर्मूलन अभियान’ अविरतपणे सुरू

सप्टेंबर २०२३पासून पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने 'मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प' अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी निरंतर अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान अविरतपणे सुरू आहे. सन २०१४ च्या गणनेनुसार, मुंबई महानगरात भटक्या श्वानांची संख्या सुमारे ९५ हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे २५ हजार भटक्या श्वानांचे सप्टेंबर २०२३ पासून आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहेत, तर मार्च २०२४ च्या शेवटपर्यंत सुमारे ७० टक्के श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे. रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी पालिकेच्या वतीने जॅनिसी स्मिथ ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स, युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी आणि उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांतील प्रशिक्षित पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सहाय्याने हे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.

भटक्या कुत्र्यांची माहिती द्या!

पालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या निरंतर अभियानामध्ये नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती द्यावी, तसेच लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी