मुंबई : कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबे, काजू आणि इतर सुका मेवा मुंबईकरांना आता वर्षभर चाखता येणार आहे. कोकण रेल्वे आणि केंद्रीय वखार महामंडळ (सीडब्ल्यूसी) यांच्यातील करारानुसार २ हजार टन क्षमतेची शीतगृह सुविधा उभारण्यात येणार आहे. हंगामी पिके दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आणि मागणीनुसार मुंबई व लगतच्या व्यावसायिक केंद्रांमध्ये वाहतूक सुलभ करण्यासाठी या हबची रचना करण्यात आली आहे.
ताज्या हापूस आंब्याचा हंगाम अतिशय अल्प कालावधीचा असतो, त्यामुळे त्यानंतर सहसा तुटवडा निर्माण होतो. हे नवीन शीतगृह आंब्याचा गर आणि इतर नाशवंत वस्तू साठवून ठेवण्यास सक्षम असेल, ज्यामुळे मुंबईतील अन्नपदार्थ व्यापारी, मिठाई उत्पादक आणि किरकोळ बाजारांना कच्च्या मालाचा अखंड पुरवठा सुलभ होईल.
१८ महिन्यांत शीतगृह बांधणार
हे बहुउद्देशीय गोदाम दुग्धजन्य पदार्थ, गोठवलेले मांस, मासे आणि विविध ताजी फळांसाठी उपयुक्त ठरण्यासाठी डिझाइन केले आहे. करारानुसार, कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन तर सीडब्ल्यूसीद्वारे प्रकल्पासाठी निधी पुरवला जाईल. या गोदामाचे बांधकाम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे ठरवले आहे.