मुंबई : सायन येथील आणिक बस डेपोच्या आवारात उभ्या असलेल्या डागा ग्रुपच्या सीएनजी मिडी बस गाड्यांना सोमवारी सायंकाळी ५.४४ वाजण्याच्या सुमाराला आग लागल्याने खळबळ उडाली. या घटनेत डागा ग्रुपच्या वेट लीजच्या १२ बसेस जळून खाक झाल्या. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यात आली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
आणिक बस डेपो, पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्ग, आरटीओ पासिंगजवळ ही घटना घडली. बस डेपोच्या आवारात शेजारी उभ्या असलेल्या ८ ते १० सीएनजी बसगाड्यांना आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे.
अग्निशमन दलाने सायंकाळी ५.५४ वाजता 'लेव्हल-१' फायर कॉल घोषित केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, पाच वॉटर टँकर, एक एरियल वॉटर टॉवर आणि क्विक रिस्पॉन्स व्हेईकलसह रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलीस आणि बेस्टच्या वाहतूक विभागानेही घटनास्थळी मदतकार्य केले.
आगीचा तपास सुरू
बसगाड्यांना आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. अहवालानंतरच नेमकी ही आग कशामुळे लागली, हे स्पष्ट होणार आहे.