मुंबई : मुंबई विधिमंडळाचे अधिवेशन थेट प्रक्षेपण करण्यात येते. त्याप्रमाणे मुंबई महापालिकेच्या सभागृहात चालणारे कामकाज थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूब प्रसारमाध्यमांवर प्रसारित करा, अशी ठरावाची सूचना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी सभागृहात मांडली आहे.
मुंबईची स्थानिक प्राधिकरण असलेली मुंबई महापालिका ही जागतिक स्तरावरील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेवर संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अख्ख्या जगाचे लक्ष असते. बृहन्मुंबई मनपाच्या सभागृहात तिच्या बंधनकारक व स्वेच्छाधीन कर्तव्यांशी निगडित असे विविध प्रभागांशी संबंधित प्रस्ताव नगरसेवक साधकबाधक चर्चा करून मंजूर करत असतात. सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या तरतुदीनुसार, महानगरपालिकेच्या सभांतील कामकाजाचे वृत्तांत त्या प्रयोजनासाठी असलेल्या कार्यवत्न पुस्तिकेत केवळ नोंद करून व ठेवण्याची तरतूद आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा विधानपरिषद या सभागृहांतील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येते. त्यामुळे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी किती प्रभावीपणे व परखडपणे त्यांच्या समस्या मांडत असतात हे लोकांपर्यंत थेट पोहोचते. मात्र, हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. सभागृहाचे कामकाज अस्तित्वात मुंबईकरांपर्यत पोहोचावे यासाठी थेट प्रक्षेपण यूट्यूब व माध्यमांमार्फत करण्यात यावे, अशी सूचना प्रभू यांनी मांडली.