मुंबई

फिरुनी नवी जन्मेन मी...; शिवाजी पार्कमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; अवघा आसमंत गहिवरला, शब्द हिरमुसले, सूरही निमाले...

गेली सात दशके आपल्या आवाजातून, गाण्यातून कोट्यवधी श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचलेला एक चिरतरुण, मधाळ आवाज अनंतात विलीन झाला. हजारोंच्या संख्येने जमलेल्या शोकमग्न चाहत्यांनी व संपूर्ण देशाने साश्रू नयनांनी सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला.

Swapnil S

मुंबई : गेली सात दशके आपल्या आवाजातून, गाण्यातून कोट्यवधी श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचलेला एक चिरतरुण, मधाळ आवाज अनंतात विलीन झाला. हजारोंच्या संख्येने जमलेल्या शोकमग्न चाहत्यांनी व संपूर्ण देशाने साश्रू नयनांनी सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला. दशकानुदशके भारतीय रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका आशाताईंच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी ४ वाजता दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्वाचे नेतेही उपस्थित होते. तब्बल सात दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलीन झाला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात भावना दाटून आल्या होत्या. प्रत्येकाचे हृदय भरून आले होते. आशाताईंच्या जाण्याने अवघा आसमंत गहिवरला, शब्द हिरमुसले, सूरही निमाले...फक्त सिनेसृष्टीच नव्हे, तर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. यावेळी प्रत्येकांच्या मनात आशाताईंनी अजरामर केलेल्या, एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी... या गीताच्या ओळी खऱ्या ठराव्यात अशाच भावना दाटून आल्या होत्या.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी रविवारी १२ एप्रिलला वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर सोमवारी १३ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता आशा भोसले यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. सिनेसृष्टीपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी आशाताईंच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री आशिष शेलार, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, अभिनेत्री नीना गुप्ता, मंगलप्रभात लोढा आणि भय्याजी जोशी, राज्यपाल जिष्णू देव शर्मा, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, विश्वास नांगरे-पाटील आदींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

गाण्यातून वाहिली श्रद्धांजली

पूर्ण देशाला आपल्या सुरांनी मोहिनी घालणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला त्यावेळी संगीत, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीत हा अंत्यविधी सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या गायक कलाकारांनी आपल्या लाडक्या 'आशा ताईं'ना त्यांच्याच गाण्यांच्या सुरांनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यविधीच्या वेळी वातावरण अत्यंत शोकाकुल होते. अशा वेळी शब्दांपेक्षा सुरांनीच भावनांना वाट करून दिली. ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांनी आशा ताईंसोबत अनेक दशके काम केले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी आशाताईंच्या आठवणीत ‘यहा कल क्या हो किसने जाना...’ हे अजरामर गाणे गायले. हे गाणे गाताना त्यांचा आवाजही गहिवरला होता, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. भजन सम्राट अनुप जलोटा यांनी देखील आपल्या खास शैलीत गाणे सादर करत आशा ताईंच्या सांगीतिक वारशाला वंदन केले. लोकप्रिय गायक शान यानेही आपल्या भावना सुरांच्या माध्यमातून मांडल्या.

प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे रविवारी दुपारी १२.०२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शरीरातील विविध अवयव निकामी झाल्याने त्याचे निधन झाले, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. आशा भोसले काही दिवसांपासून आजारी होत्या. मात्र, त्यातून बऱ्या होऊन त्या पुन्हा जाहीर कार्यक्रमाच्या तयारीलाही लागल्या होत्या. त्यांना प्रेक्षकांशी संवाद साधण्याची इच्छा होती. अवघ्या काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे चिरंजीव अर्जुन तेंडुलकर यांच्या विवाहालादेखील त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे शनिवारी त्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, त्यांच्या जिद्दी स्वभावाला अनुसरून लवकरच त्या बऱ्या होऊन घरी परततील, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, रविवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Thane : भ्रष्ट व्यवस्थेचे बळी; मुरबाडजवळ दोन गाड्यांची धडक, ११ जण जागीच ठार

डॉ. आंबेडकरांना अपमानित करण्याचे षड्‍यंत्र

प्रशासकीय सेवेतील ‘भूषणा’वह गगनभरारी!

Ambedkar Jayanti 2026 : बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार; खास Quote Cards डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर शेअर करा

आंब्याच्या सीजनमध्ये घरच्या घरी बनवा गारगार 'मँगो मस्तानी', फारच सोपी रेसिपी