BEST ला जाहिरातींचा आधार; दोन वर्षांत ११४.१३ कोटींचा महसूल जमा  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

BEST ला जाहिरातींचा आधार; दोन वर्षांत ११४.१३ कोटींचा महसूल जमा

बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात बस डेपो आणि बस स्थानकावरील जाहिरातीतून मिळणारे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे.

Swapnil S

मुंबई : बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात बस डेपो आणि बस स्थानकावरील जाहिरातीतून मिळणारे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. गेल्या दोन वर्षांत २०२४-२५ मध्ये बस डेपो व बसस्थानक तसेच बसेसवरील जाहिरातून ५८.६१ कोटी, तर वर्ष २०२५-२६ मध्ये ५५.५२ कोटी महसूल प्राप्त झाला आहे. या दोन्ही आर्थिक वर्षांत मिळून बेस्टला एकूण ११४.१३ कोटींचे जाहिरात उत्पन्न मिळाले आहे.

गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती खालावली आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने जानेवारी २०१२-१३ पासून जून २०२६ पर्यंत तब्बल १३ हजार कोटींची आर्थिक मदत केली आहे. मात्र बेस्ट उपक्रमाने आर्थिक मदतीचे काय केले, याचा हिशोब न दिल्याने पालिकेने नाराजी व्यक्त करत उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याची सूचना केली. त्यानंतर बेस्ट उपक्रमाने महसूल वाढीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे बेस्ट उपक्रमा कडून सांगण्यात आले.

प्रवासी वाहतूक, कर्मचारी वेतन, इंधन खर्च आणि बसताफ्याच्या देखभालीमुळे बेस्टवर मोठा आर्थिक ताण आहे. अशा परिस्थितीत तिकीट महसुलाव्यतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर बेस्ट प्रशासनाने विशेष भर दिला आहे. त्यामध्ये बसच्या बाह्य भागावरील जाहिराती, बस शेल्टरवरील होर्डिंग्ज, डिजिटल जाहिरात फलक आणि ब्रँडिंग उपक्रमांचा समावेश आहे.

जाहिरात महसुलामुळे बेस्टच्या आर्थिक स्थितीला काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी वाढत्या खर्चाच्या तुलनेत हा महसूल अधिक वाढविण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मुंबईसारख्या महानगरात दररोज २५ लाख प्रवासी बेस्टच्या बससेवेचा वापर करतात. त्यामुळे बस आणि बस शेल्टर ही जाहिरातींसाठी प्रभावी माध्यमे आहेत.

बेस्ट प्रशासनाकडून आगामी काळात अधिक आकर्षक जाहिरात धोरण राबविणे, डिजिटल माध्यमांचा वापर वाढविणे तसेच नवीन जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतींचा विचार केला जात असल्याची माहिती आहे.

जाहिरातीतून असे मिळाले उत्पन्न

  • २०२४-२५ - ५८.६१ कोटी

  • २०२५-२६ - ५५.५२ कोटी

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ; चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

Mumbai : हरित क्षेत्रातील सुविधांसाठी मोजा पैसे! कोस्टल रोड प्रकल्पातील ७० हेक्टर हरितक्षेत्र रिलायन्स फाऊंडेशन विकसित करणार

हा आठवडा निर्णायक! शेअर बाजाराची नेमकी दिशा ठरणार; सोने-चांदी दराची कसोटी लागणार

मुंबईत तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस

महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार; पुलाचे काम ९० टक्के पूर्ण