मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी करून मिळणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत कंत्राटदारांकडून वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाने केले आहे. मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत.
मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा १४ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी तात्पुरता वीजपुरवठा घेऊ इच्छिणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक कागदपत्रे, परवानग्या आणि शुल्काची पूर्तता करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने केले आहे.
मंडळांनी ‘बेस्ट’ संकेतस्थळावर करा अर्ज नोंदणी
प्रत्येक ग्राहक सेवा विभागात तात्पुरत्या वीजपुरवठ्यासाठी अर्ज स्वीकारण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या मंडळांनी बेस्टच्या संकेतस्थळावर अर्ज नोंदवून त्याची प्रिंट संबंधित ग्राहक सेवा विभागात जमा करणे आवश्यक आहे.
मंडळांनी अर्जामध्ये मंडळाचे नाव, संपूर्ण पत्ता, वीजपुरवठा आवश्यक असलेला कालावधी, जबाबदार प्रतिनिधीचे नाव व संपर्क क्रमांक तसेच बँक खात्याची माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. अनामत रकमेच्या परताव्यासाठी ‘एनईएफटी’ फॉर्म भरून सादर करावा लागणार आहे. प्रत्यक्ष वीजवापराचे समायोजन झाल्यानंतर उर्वरित रक्कम संबंधित बँक खात्यात जमा करण्यात येईल.
निवासी दरात वीज जोडणी
शुल्काबाबत बेस्टने अर्ज नोंदणी शुल्क, जोडणी शुल्क, अनामत रक्कम आणि मीटर अनामत रकमेचे दर निश्चित केले आहेत. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजूर केलेल्या दरपत्रकानुसार गणेशोत्सव मंडळांना निवासी स्वरूपाच्या सवलतीच्या दराने वीज आकारली जाणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
संबंधितांची परवानगी आवश्यक
वीजपुरवठ्यासाठी अर्जासोबत जागा मालक अथवा गृहनिर्माण संस्थेची परवानगी, विद्युत निरीक्षकाकडे सादर केलेल्या अर्जाची प्रत, अधिकृत विद्युत ठेकेदाराने दिलेला चाचणी अहवाल तसेच ‘ईएलसीबी’ चाचणी अहवाल जोडणे आवश्यक आहे. रस्ता किंवा पदपथावर मंडप उभारणाऱ्या मंडळांनी बृहन्मुंबई महापालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या परवानगीची प्रतही सादर करावी लागणार आहे.
याची घ्यावी खबरदारी
बेस्टने विद्युत सुरक्षेबाबत विशेष सूचना देताना मंडपातील सर्व वायरिंग अधिकृत ठेकेदारामार्फत भारतीय विद्युत नियमांनुसार करणे, जमिनीवर उघड्या विद्युत तारा न ठेवणे आणि मार्गप्रकाशाच्या खांबांना वायर गुंडाळू नयेत, असे स्पष्ट केले आहे.