धीरज परब
भाईंदर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालमित्र असलेले अजगरअली वोरा यांनी आपल्या जमिनीबाबत झालेल्या महसुली फेरफारांबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
बनावट वारस उभे करण्यासह चुकीच्या माहितीच्या आधारे हे भूखंड लाटण्याचे कारस्थान केले गेल्याने याबाबत कायदेशीर कारवाई व्हावी अशी विनंती वोरा यांनी केली आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी केल्यास त्यात कोण कोण लहान मोठे मासे अडकतील याकडे लोकांचे लक्ष लागून राहणार आहे.
मीरारोडच्या मौजे नवघर येथील सर्वे क्रमांक १८५/६ हि २८१० चौमी जागा असगर अली वोरा यांनी १९८९ मध्ये खरेदी केली होती. त्या करारनाम्यात लोबो आणि फर्नाडिस कुटुंबियांच्या नावांचा समावेश आहे. २००७ सालात सातबारावर असगर अली आणि दाऊद वोरा यांची नावे खरेदीखताने फेरफारने नोंदवलेली होती. मात्र नोव्हेंबर २००७ मध्ये पॉल अंतोनि फर्नाडिस यांच्या वारसांच्या चौकशीचे आदेश होऊन वोरा यांची केलेली नोंद रद्द केली गेली. वास्तविक १९८९ च्या खरेदी करारनाम्यात जागा विक्री करणाऱ्यांत पॉल यांची देखील सहमती व स्वाक्षरी होती. एकदा विक्री केलेल्या जमिनीच्या हिस्सेदाराच्या वारस तपास करण्याचा प्रकार आश्चर्यचकित करणारा होता.
पॉल आंतोन फर्नाडिस आणी रोझ कॅथरीन फर्नांडिस यांच्या हिश्याची जागा १९८९ सालीच नोंदणीकृत कराराने वोरा यांना विक्री झालेली असताना २०१४ मध्ये मार्विन जोसेफ फर्नांडिस ह्या मुंबईच्या खारदांडा येथील ७४ वर्षीय व्यक्तीची एंट्री झाली. त्यांनी पॉल हे आपले वडील जोसेफ यांचे भाऊ होते आणि पॉल व रोझ यांच्या मृत्यूनंतर आपणच एकमेव वारस असल्याचे न्यायालयात सांगत वारस हक्क प्रमाणपत्र मिळवले. न्यायालयाने प्रमाणपत्र व दावा मंजूर केल्याने मार्विन यांचे नाव एकूण जागेच्या ५० टक्के क्षेत्रावर सातबारा नोंदी आले.
मार्विनसह मुकेश पारेख आणि संदीप पराडकर यांच्या सहमतीच्या आधारे ती जागा २०१९ साली ७११ कन्स्ट्रक्शन कंपनीने खरेदी केली होती. वास्तविक पॉल आणि रोझ फर्नांडिस यांनी त्यांची जमीन विक्री केली असताना जरी मार्विन यांनी वारस असल्याचे सांगितले तरी त्याच्या हिश्यात ५० टक्के जमिनीपैकी केवळ एक तृतीयांश जमिनीची नोंद व्हायला हवी होती. मात्र इकडे त्याच्या नावे पूर्ण ५० टक्के जमीन हक्क नोंदवला गेला.
परंतु पॉल फर्नांडिस यांचे वडिलांचे नाव अंतोन तर मार्विन याचे वडील जोसेफ यांच्या वडिलांच्या नावात तफावत असल्याचा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. पॉल आणि रोझ यांना जोसेफ नावाचा भाऊ नसल्याचे आणि मार्विन ह्याचा मालकी हक्क असलेल्या कुटुंबाशी कोणताही संबंध नसतानाही त्याने वारसा हक्क प्रमाणपत्र मिळवले याची चौकशी पोलिसांमार्फत करण्याची मागणी केली आहे. शिवाय मार्विन ह्याने न्यायालयात जी पुरावे म्हणून कागदपत्रे नमूद केली होती त्यातील बहुतांश ओळखीचा पुरावा असलेली व अन्य अनेक पुरावेच न्यायालयात सापडले नाही असे माहितीच्या अधिकारात आढळून आले असे वोरा यांच्या तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणातील पोलीस चौकशी त्वरित पूर्ण करावी. एकूण भूखंडाच्या ५०% भागाबाबत केलेला २१०५ क्रमांकाचा फेरफार चुकीचा असून तो रद्द करावा. मर्विन जोसेफ फर्नांडिस आणि या गुन्ह्यात त्यांना साथ देणाऱ्यांवर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार त्वरित कारवाई करून त्यांना शिक्षा केली जावी अशी मागणी वोरा यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
लोबो आणि फर्नांडिस कुटुंब असल्याने एकूण जमिनीपैकी ते प्रत्येकी ५० टक्के हिस्सेदार दाखवण्यात आले. त्यात स्वयम बिल्डरचे भागीदार लालजीभाई गोविंदभाई सोळंकी यांनी लोबो कुटुंबाचे कुलमुखत्यार म्हणून मॅक्सी ग्रेसीयस यांच्या कडून २०११ साली नोंदणी कराराने ५० टक्के हिस्सा खरेदी केला. वास्तविक १९८९ साली नोंदणी कराराने जमीन विक्री झालेली असताना पुन्हा त्याच जमिनीची विक्री केली गेली.
स्वयम बिल्डर ने खरेदी केलेल्या लोबो कुटुंबाच्या ५० टक्के हिस्सा प्रकरणी वोरा यांनी तक्रार केल्यावर चौकशी करण्यात आली. त्या मध्ये लोबो कुटुंबीयांनी देखील वोरा यांच्या बाजूने साक्ष देत स्वयम बिल्डरच्या करारात दाखवण्यात आलेले कुलमुखत्यारपत्र हे लोबो कुटुंबाच्या १८६/१३ ह्या जागेसाठीचे असल्याचे समोर आले.
ह्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी काय आणि कशी चौकशी केली? दिरंगाई केली का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. खोट्या कागदपत्र आधारे जमीन खरेदी व्यवहार केल्याचा गुन्हा दाखल असताना देखील स्वयं बिल्डर ने वोरा यांच्या जमिनीवर कब्जा अजून कायम ठेवला आहे.
कारवाईसाठी वेगाने हालचाली
वोरा यांनी केलेल्या तक्रारीची प्रत दैनिक नवशक्तीच्या हाती लागली आहे. पंतप्रधान यांच्या भेटी नंतर त्यांचे बालमित्र असगर अली वोरा यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता शासन स्तरापासून वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रशासनातील गैरप्रकार आणि अधिकाऱ्यांशी संधान साधून विकासक - राजकारणी यांनी वोरा यांना गेल्या १५ वर्षांपासून अतोनात त्रास दिला असल्याने त्यांनी कारवाईची मागणी कायम ठेवली आहे.
स्वयम बिल्डरवर पूर्वीही गुन्हा
स्वयम बिल्डर व अन्य यांनी संगनमताने कारस्थान करून कुलमुखत्यार पत्रात खाडाखोड करत हिस्सा क्रमांक १३ ऐवजी ६ लिहिला आणि क्षेत्र हे १०१० ऐवजी २८१० असे लिहून खाडाखोड केलेल्या बनावट कागदपत्राच्या आधारे खरेदी व्यवहार केल्याचे समोर आले. त्या प्रकरणात शासनाकडूनच २०१५ साली स्वयम बिल्डर व अन्य यांच्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मार्विन यांच्याशी संपर्क नाही
या प्रकरणी मार्विन फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे भाईंदर गावातील जुन्या लोकांशी बोललो असता, आम्ही केवळ पॉल आणि रोझ या भावाबहिणींनाच पाहत आलो आहे. ते दोघेही येथे राहत होते. त्यांना जोसेफ नावाचा भाऊ असल्याचे आमच्या माहितीत नाही, असे त्यांनी सांगितले.