मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील खर्च, लेखापरीक्षण आणि मंजुरी प्रक्रियेवरून सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक सुनील गणाचार्य आणि शिंदे सेनेच्या नगरसेविका तथा बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्यात 'तू तू मैं मैं' झाल्याने काही काळ बैठकीत वातावरण चांगलेच तापले.
अर्थसंकल्पाचा प्रस्ताव आणि तुम्ही विषय समजून घेत नाही याचा अर्थ तुम्हाला विषयाचे गांभीर्य नाही, अशा शब्दात सुनील गणाचार्य यांनी तृष्णा विश्वासराव यांच्यावर जोरदार प्रहार केला.
नियमावलीचे पालन होत नाही
बैठकीत २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सुनील गणाचार्य यांनी समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, प्रत्येक महिन्याच्या छाननी अहवालावर किमान दोन सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक असल्याचे सांगितले. फेब्रुवारी महिन्यात समितीची स्थापना झाल्यानंतरही नियमावलीचे पालन होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रत्येक बैठकीत माहिती समितीसमोर ठेवली जाणार
यावर बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी स्पष्टीकरण देताना दरवर्षी मुंबई महापालिकेच्या लेखा विभागामार्फत हिशेबांची तपासणी केली जाते. लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतरच सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात तसेच प्रत्येक बैठकीत संबंधित माहिती समितीसमोर ठेवली जाईल, असेही त्या म्हणाल्या.
वीजपुरवठा विभाग नफ्यात
उबाठाचे नगरसेवक बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी तुटीचा अर्थसंकल्प सादर होत असताना ती तूट भरून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, असा सवाल उपस्थित केला. विद्युत विभागातील वीज विक्रीचे प्रमाण कमी असतानाही नफा वाढल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर सोनिया सेठी यांनी वीजपुरवठा विभागातील पुरवठा व्यवसायातील उत्पन्न वाढल्यामुळे नफा वाढल्याचे स्पष्ट केले.
तिकीट उत्पन्नातही वाढ
बैठकीत बेस्टच्या आर्थिक स्थितीवरही चर्चा झाली. सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेट-लीज बस सेवेतून सुमारे ५४९ कोटी रुपयांचा नफा झाला असून तिकीट उत्पन्नातही वाढ झाली आहे. विद्युत विभागात ग्राहकसंख्या वाढून वीज मागणी ९०७ मेगावॅटपर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र ताळेबंद, मालमत्ता
तसेच २०२५-२६ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प १० ऑक्टोबर रोजी समितीसमोर सादर केला जाणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. विद्युत व परिवहन विभागांचे स्वतंत्र ताळेबंद, मालमत्ता आणि बँक खाती ठेवण्याबाबतही चर्चा झाली.
काही काळ शाब्दिक वाद
मात्र, प्रस्ताव मंजुरीच्या वेळी सुनील गणाचार्य यांनी कामकाजाच्या पद्धतीवर आक्षेप घेतल्यानंतर अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी दोन्ही सदस्यांमध्ये काही काळ शाब्दिक वाद रंगला. तुम्ही प्रस्ताव सादर करा आणि आम्ही हो म्हणतो असा हल्लाबोल गणाचार्य यांनी केला असता तृष्णा विश्वासराव यांनी प्रस्ताव मंजूर केल्याचे स्पष्ट केले.